वरळीतील नेहरू विज्ञान केंद्र ते तारांगण उड्डाणपुलाचे काम 31 जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी 30 सप्टेंबर 2026 रोजी पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
वरळीतील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगण दरम्यानचा उड्डाणपूल आणि सब वे प्रकल्प अनेक दिवसांपासून लोक वाट पाहत आहेत. या कामाबद्दल आता नवी माहिती समोर आली आहे. प्रकल्पाचे काम येत्या 31 जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. बांगर यांनी 30 सप्टेंबर 2026 रोजी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी जाऊन कामाच्या सध्याच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
नेहरू विज्ञान केंद्राच्या बाजूला (NSC Side) 1200 मिलिमीटर व्यासाच्या मुख्य पाइलचे काम 100 टक्के झाले आहे. या बाजूला एकूण 18 पैकी 17 पाइल कॅप, 18 पैकी 17 पिअर आणि 18 पैकी 17 पिअर कॅपचे काम पूर्ण झाले आहे. जिजामाता नगरच्या बाजूलाही 1200 मिलीमीटर व्यासाचे मुख्य पायलिंग पूर्ण झाले आहे. तिथे 17 पैकी 17 पाइल कॅप, 17 पैकी 17 पिअर आणि 17 पैकी 17 पिअर कॅप तयार आहेत.
पोर्टल बीम आणि गर्डर तयार करण्याचे काम प्रकल्पस्थळी आणि निर्मिती केंद्रात सुरू आहे. एकूण 14 पैकी 14 पोर्टल बीमचे काम झाले आहे. 18 गर्डर स्पॅनपैकी 17 स्पॅन तयार झाले असून उरलेल्या 1 गर्डर स्पॅनचे काम सुरू आहे.
उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे. 14 पैकी 13 पोर्टल बीम उभे झाले आहेत, तर 18 पैकी 9 गर्डर स्पॅन उभारून झाले आहेत. डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण एकूण 18 स्पॅनपैकी 7 स्पॅनमध्ये पूर्ण झाले आहे आणि आणखी 2 स्पॅनमध्ये ते सुरू आहे.
या उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. सध्या या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांना वरळी नाका (आचार्य अत्रे चौक) येथून वळसा घालून जावे लागते. प्रस्तावित पुलामुळे प्रवासाचा वेळ सुमारे 15 मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.
ई. मोझेस मार्गावरून थेट अॅनी बेझंट मार्ग आणि धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गाकडे (Coastal Road) जाण्यासाठी या पुलामुळे अधिक सोपा आणि जवळचा रस्ता मिळणार आहे. लोअर परळ, महालक्ष्मी आणि करी रोडकडून येणाऱ्या वाहनांनाही या पुलाचा थेट वापर करता येईल. त्यामुळे वरळी नाका परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. अंतर आणि कोंडी कमी झाल्याने वाहनचालकांच्या इंधनाचीही बचत होणार आहे.
उरलेली कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि इतर साधनांचे योग्य नियोजन करावे, असे बांगर यांनी सांगितले. कामाचा वेग वाढवावा, तसेच विविध विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधून काम पुढे न्यावे, असेही निर्देश त्यांनी दिले. वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून वाहतूक आराखडा तयार करावा, असेही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशांत म्हटले आहे.