४५ मिनिटांचा प्रवास २० मिनिटांत येण्याची अपेक्षा; जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगात, ३१ डिसेंबर २०२७ चे
पश्चिम उपनगरांतील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका जेव्हीपीडी उड्डाणपूल उभारत असून तो ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत खुला करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पश्चिम उपनगरांतील तीव्र वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महापालिका जेव्हीपीडी (जुहू-विलेपार्ले डेव्हलपमेंट स्कीम) उड्डाणपूल उभारत आहे. हा पूल ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. निर्धारित मुदतीच्या आधीच हे काम पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
या पुलामुळे गर्दीच्या वेळेत लागणारा सुमारे ४५ मिनिटांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी नुकतीच प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा सविस्तर आढावा घेतला.
अंधेरी पश्चिम येथील सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाच्या टोकापासून जुहू-वेसावे जोड रस्त्यापर्यंत हा पूल उभारला जात आहे. त्याची लांबी १ हजार ७५० मीटर म्हणजेच १.७५ किमी असून रुंदी १५.१० मीटर आहे. प्रकल्पाची मूळ अंतिम मुदत ३१ मार्च २०२८ आहे. तरीही नागरिकांना लवकर दिलासा मिळावा, म्हणून कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले आहेत.
या कामात काही मोठी आव्हाने आहेत. भूगर्भातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा हलवाव्या लागत आहेत, तसेच मेट्रो मार्गिका २ बी च्या कामाशी ताळमेळ राखावा लागत आहे. यात ६०० आणि ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या ४०० मीटरपर्यंत स्थलांतरित करायच्या आहेत. १२०० मिमी व्यासाची मलवाहिनी 'मायक्रोटनेलिंग' तंत्रज्ञानाने हलवली जाणार आहे. मेट्रो स्थानकाखालून आडव्या दिशेने गर्डर सरकवण्याचेही काम आहे. ही सर्व कामे गुंतागुंतीची आहेत.
याशिवाय ९० फूट जंक्शनवर ७ मीटर लांबीचा कमानी पूल आणि जुहू सर्कल येथे कमी खांबांवर मोठे स्पॅन उभारले जाणार आहेत. ही कामे ठरलेल्या वेळेत व्हावीत म्हणून संपूर्ण प्रकल्पाची तीन टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. स्वतंत्र चमूंनी समांतर पद्धतीने काम करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
पुलामुळे जुहू सर्कलसह परिसरातील पाच प्रमुख वाहतूक जंक्शनवरील ताण पूर्णपणे दूर होणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. प्रस्तावित वेसावे-वांद्रे सागरी सेतू आणि मुंबई किनारा रस्ता (उत्तर) यांच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना याचा मोठा फायदा होईल. जुहू, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि वसौंवा परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूकही गतिमान होण्यास मोठी मदत होईल, असेही पालिकेने सांगितले.