बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:31 IST

म्हसवड-शिंगणापूर रस्त्यावर दोन इर्टिका कार समोरासमोर धडकल्या, सहा जण जखमी

माण तालुक्यातील भवानी टेक येथे रविवारी दुपारी झालेल्या अपघातात दोन्ही कारमधील सहा प्रवासी जखमी झाले असून, धोकादायक वळणाची सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.

म्हसवड-शिंगणापूर रस्त्यावर दोन इर्टिका कार समोरासमोर धडकल्या, सहा जण जखमी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

माण तालुक्यातील म्हसवड-शिंगणापूर रस्त्यावर भवानी टेक (राजेमाने यांचा मळा) येथे रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. दोन इर्टिका कार एकमेकींवर समोरासमोर जोरात आदळल्या. या धडकेत दोन्ही कारमधील सहा प्रवासी जखमी झाले असून दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त इर्टिका कारपैकी एक कार वरकुटे-म्हसवड येथील बनवस्तीवरील आहे, तर दुसरी कार माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आहे. अपघातग्रस्त गाड्यांचे क्रमांक MH 45 AZ 4052 आणि MH 04 LY 5388 असे आहेत.

वरकुटे येथील बनवस्तीवरील महेश तानाजी चव्हाण (वय २८), त्यांची आई सुनंदा तानाजी चव्हाण (वय ४७), त्यांची पत्नी सायली महेश चव्हाण (वय २४) आणि गौरी दादा जाधव (वय २२) हे या अपघातात जखमी झाले आहेत. पिलीव येथील कारमधील समाधान खरात हेही जखमी झाले आहेत. सहाव्या जखमी व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

भवानी टेक परिसरात रस्त्यावर एक छोटे वळण आणि टेकडी आहे. त्यामुळे समोरून येणारे वाहन वेळेत दिसत नाही, असे सांगितले जात आहे. रस्त्याच्या सदोष रचनेमुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक लोक करत आहेत. याआधी म्हसवड-मायणी रस्त्यावरील वडजल येथेही अशाच प्रकारचा अपघात झाला होता. त्यामुळे या धोकादायक ठिकाणांची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करावी आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

अपघातानंतर तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. भवानी टेक येथील धोकादायक वळणावर सूचना फलक, वेगमर्यादा फलक आणि रस्ता सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे. भविष्यात मोठी जीवितहानी होण्यापूर्वी संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे, अशी गरज व्यक्त केली जात आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ