'इरावती' मराठी चित्रपट १२ फेब्रुवारी २०२७ ला प्रदर्शित होणार, अलका कुबल-आठल्ये, सुनील बर्वे प्रमुख भूमिकेत
नात्यांचा आणि रहस्याचा धागा गुंफणारा 'इरावती' हा मराठी चित्रपट १२ फेब्रुवारी २०२७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नात्यांची कथा सांगणारा आणि त्यासोबत रहस्याची जोड असलेला 'इरावती' हा मराठी चित्रपट नव्या वर्षात, १२ फेब्रुवारी २०२७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चिन्मय प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन निलेश देशपांडे यांनी केले आहे, तर निर्मिती डॉ. दिनेश वैद्य यांची आहे.
जन्माला आल्यापासूनच आपण काही नात्यांच्या बंधनात असतो आणि काही नाती आयुष्याच्या प्रवासात नकळत जुळत जातात. काही नाती रक्ताची असतात, तर काही माया, प्रेम, आपुलकी आणि विश्वासाच्या धाग्यांनी विणलेली असतात. अशाच जिव्हाळ्याच्या नात्यांची आणि आपुलकीची गोष्ट या चित्रपटातून समोर येते.
चित्रपटात सतीश पुळेकर, अलका कुबल-आठल्ये, विजय गोखले, सुनील बर्वे, संतोष जुवेकर, जुई भागवत, स्वरदा करंदीकर, मृणालिनी जांभळे आणि अवंती सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुभवी कलाकारांची फळी आणि नात्यांमधील भावविश्व उलगडणारी कथा यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
निर्माते डॉ. दिनेश वैद्य म्हणाले, "'इरावती' ही केवळ एका चित्रपटाची कथा नाही, तर माणसांमधील नात्यांचा आणि भावबंधांचा शोध घेणारा अनुभव आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात नाती जपणं, त्यांना समजून घेणं आणि त्यांचं महत्त्व जाणणं अधिक गरजेचं झालं आहे. प्रेक्षकांना आपल्या आयुष्याशी जोडणारा, मनाला स्पर्श करणारा आणि चित्रपट संपल्यानंतरही विचार करायला लावणारा आशय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 'इरावती' प्रेक्षकांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करेल, अशी आशा आहे."
दिग्दर्शक निलेश देशपांडे यांनी चित्रपटाविषयी बोलताना सांगितले, "प्रत्येक नात्याला स्वतःची एक गोष्ट असते. या नात्यांमधील भावभावना, त्यात दडलेली ओढ आणि माणसांना एकमेकांशी जोडणारे अदृश्य धागे यांचा वेध 'इरावती'मधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही कथा प्रेक्षकांना केवळ भावनिक अनुभव देणार नाही, तर आपल्या आयुष्यातील नात्यांकडे नव्याने पाहण्याची जाणीवही करून देईल, असा मला विश्वास आहे."
चित्रपटाची कथा डॉ. दिनेश वैद्य यांची आहे. पटकथा नंदू परदेशी यांनी लिहिली असून संवादलेखनाची जबाबदारी डॉ. दिनेश वैद्य आणि नंदू परदेशी यांनी सांभाळली आहे. छायाचित्रण अनिकेत के यांनी केले आहे, तर संकलन सुबोध नारकर यांचे आहे. पायलट साऊंडची जबाबदारी राशी बुट्टे यांच्याकडे होती.
कला दिग्दर्शन महेंद्र राऊत यांचे आहे, तर संभाजी जायेभाये यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. संगीतदिग्दर्शन कमलेश भडकमकर यांचे असून मिक्सिंग इंजिनिअर म्हणून अभिजीत श्रीराम देव यांनी काम केले आहे. वेशभूषा ममता मंडल आणि विदुला तामोरे यांनी केली आहे. रंगभूषेची जबाबदारी सुदर्शन कुलाबकर यांच्याकडे, तर केशभूषेची जबाबदारी जयश्री नाईक यांच्याकडे होती. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं दमदार मनोरंजन करेल, अशी अपेक्षा आहे.