'रामायणम्'च्या नव्या पोस्टरमध्ये जटायू, अनुपम खेर देणार आवाज
नमित मल्होत्रा यांच्या निर्मितीतील 'रामायणम्' चित्रपटाच्या जटायूच्या नव्या पोस्टरचे प्रदर्शन झाले असून, या व्यक्तिरेखेला ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आवाज देणार आहेत.
'रामायणम्' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. निर्माते चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखांची पोस्टर्स एकामागून एक प्रदर्शित करत असून, त्यातून या महाकाव्याची झलक प्रेक्षकांना दाखवत आहेत. आता निर्मात्यांनी जटायूचे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पूजनीय व्यक्तिरेखेला ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आपला आवाज देणार आहेत. धर्म, त्याग आणि साहसाचे प्रतीक असलेल्या जटायूमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
नमित मल्होत्रा यांच्या निर्मितीतील या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये जटायूचे प्रभावी रूप पाहायला मिळते. जटायूची गहन नजर आणि विशाल पंख पोस्टरमध्ये लगेच लक्ष वेधून घेतात. 'धर्माचे पंख' असे शीर्षक असलेल्या या पोस्टरमधून सत्याच्या बाजूने उभे राहण्याचा जटायूचा निर्धार आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे साहस अधोरेखित करण्यात आले आहे.
रामायणातील जटायू हे एक महत्त्वाचे आणि पूजनीय पात्र आहे. माता सीतेचे रावणापासून रक्षण करण्यासाठी जटायू यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता रावणाशी युद्ध केले. रावणाची अफाट शक्ती माहीत असूनही त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला. विजय मिळवण्यापेक्षा धर्म आणि सत्याच्या बाजूने उभे राहणे महत्त्वाचे आहे, हा संदेश जटायूच्या कथेतून मिळतो.
चित्रपटात जटायूच्या व्यक्तिरेखेला अनुपम खेर यांचा आवाज लाभणार आहे. त्यांच्या आवाजातून या पात्राचे धैर्य, निष्ठा आणि त्याग प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. पोस्टरसोबत शेअर करण्यात आलेल्या संदेशातूनही या व्यक्तिरेखेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
या चित्रपटात भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. रणबीर कपूर भगवान राम यांच्या भूमिकेत, साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत, तर रॉकिंग स्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सनी देओल हनुमान आणि रवी दुबे लक्ष्मण यांच्या भूमिकेत झळकणार आहेत.
नितेश तिवारी यांनी या भव्य चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजने DNEG आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहकार्याने चित्रपटाची निर्मिती केली आहे. रामायणासारख्या महाकाव्याची कथा भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर साकारण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे.
'रामायणम्' दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे.
हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना तो IMAX फॉरमॅटमध्येही पाहता येईल. भारताबाहेरील वितरणाची जबाबदारी सोनी पिक्चर्स सांभाळणार आहे, तर हिंदी भाषिक बाजारपेठेतील वितरण धर्मा प्रॉडक्शन्सकडे असेल.
जटायूच्या नव्या पोस्टरमुळे चित्रपटातील व्यक्तिरेखांची ओळख अधिक रंजक होत आहे. अनुपम खेर यांच्या आवाजातून जटायूचे शौर्य आणि धर्मनिष्ठा कशा प्रकारे साकारली जाणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.