माणगाव तालुक्यात भातशेतीचे ७० टक्के नुकसान, शेतकऱ्यांची दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
अतिवृष्टीनंतर पावसाने दडी मारल्याने माणगाव तालुक्यातील भातशेती अडचणीत आली आहे. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
माणगाव तालुक्यात यंदा पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका भातशेतीला बसला आहे. सुरुवातीला पेरणीला उशीर झाला, मग अतिवृष्टी झाली आणि भात पक्व होण्याच्या काळात पावसाने खंड दिला. या सगळ्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुक्यातील जवळपास ७० टक्के शेतीचे नुकसान झाल्याचा दावा शेतकरी करत आहेत. माणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, ही मागणी जोर धरत आहे.
हंगामाच्या सुरुवातीला पाऊस वेळेवर पडेल का, तसेच एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाऊस कमी राहील की काय, या चिंतेने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी लांबणीवर टाकली. त्यानंतर काही काळ अतिवृष्टी झाली आणि अनेक ठिकाणी भाताची रोपवाटिका, म्हणजे तरवे, पाण्याखाली गेले. काही शेतकऱ्यांना हवी तेवढी रोपे तयार करता आली नाहीत. त्यामुळे वेळेवर भातलागवड करण्याचे नियोजन विस्कळीत झाले.
लागवडीच्या काळात काही प्रमाणात समाधानकारक पाऊस झाला. मात्र उपलब्ध रोपांच्या आधारे उखाड पद्धतीने लागवड करावी लागली. त्याचा परिणाम पिकाच्या वाढीवर आणि अपेक्षित उत्पादनावर झाला.
भाताला दाणे भरण्याच्या आणि पक्व होण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने अचानक दडी मारली. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने दाणे पूर्णपणे भरू शकले नाहीत. अनेक ठिकाणी दाणे अर्धवट राहिल्याने भात पोचट झाला आहे आणि उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. आधी अतिवृष्टी आणि मग पावसाचा खंड, अशा दुहेरी संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
काही भागांत भाताची पिके चांगली दिसत असली, तरी शेतातील वास्तव वेगळे आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तालुक्यातील सुमारे ७० टक्के शेतजमिनीचे नुकसान झाले असून अनेकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे, असा दावा केला जात आहे. त्यामुळे गावनिहाय पीकस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत. भातशेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित यंदा कोलमडले आहे. बियाणे, खते, मजुरी आणि मशागतीसाठी केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. शासनाने माणगाव तालुक्यातील भातशेतीची गावनिहाय पाहणी करावी, पंचनामे करून नियमानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि दुष्काळाचे निकष तपासून माणगाव दुष्काळग्रस्त जाहीर करावा.
चेरवली येथील प्रगत शेतकरी संदीप खडतर म्हणाले, "यावर्षीचे दुष्काळाचे संकट वेगळ्या प्रकारचे आहे. जवळपास ७० टक्के शेती नुकसानग्रस्त झाली आहे. भातशेतीतून अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण झाले आहे. माणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केल्यास शेतकऱ्यांना पुढील हंगामात शेतीसाठी काही प्रमाणात आर्थिक मदत मिळू शकेल. बियाणे, खते आणि इतर आवश्यक साहित्याचा पुरवठा झाल्यास संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभारी घेता येईल. शासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा."
खडतर यांनी असेही म्हटले की, शेतात जे थोडेफार पीक आहे, त्यावरही अति उष्णतेचे आणि पावसाचे संकट आहे. यापुढे भातशेती तयार होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.