माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना
उतेखोल आणि माणगाव परिसरात नळाला मातीमिश्रित गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी; नगरपंचायतीने तातडीची बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या.
उतेखोल आणि माणगाव परिसरातील नागरिकांना सध्या नळाला मातीमिश्रित, गढूळ रंगाचे पाणी येत असल्याने महिलांसह सगळ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. माणगाव नगरपंचायत हद्दीत ही समस्या उद्भवली असून, याबाबत नगरपंचायतीकडून नागरिकांना वेळेत माहिती किंवा दवंडी न दिल्यानेही लोकांमध्ये संताप आहे.
पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळ नदी आणि आजूबाजूच्या डोंगराळ भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. या सततच्या पावसामुळे नदीचे पाणी तांबडेलाल आणि चिखलमिश्रित झाले आहे. हेच मातीमिश्रित पाणी जॅकवेलमधून उपसा पंपाच्या साह्याने थेट उतेखोल येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तिथे तुरटी आणि टीसीएल पावडरचा वापर करून फिल्टरेशन प्लांटमधील टाक्यांमधून पाणी शुद्ध केले जाते, म्हणजे नदीतून येणारे गढूळ पाणी या प्रक्रियेनंतरच नळांना पोहोचवले जाते.
मात्र सध्या अधूनमधून कोसळणारा जोरदार पाऊस आणि त्यामुळे सतत बदलणारा काळ नदीच्या पाण्याचा रंग यामुळे शुद्धीकरण प्रक्रिया करूनही कधीकधी नळाला गढूळ पाणी येते, असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले. यामुळे नागरिकांनी सध्या साठवलेले पाणी गाळून आणि उकळूनच पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे.
शुद्धीकरणानंतर पाणी येथील तीन मोठ्या साठवण टाक्यांमध्ये आणले जाते आणि त्यानंतर नऊ पाइपलाइनद्वारे तीन पाळ्यांमध्ये दिवसभर नळ कनेक्शनला पाणीपुरवठा केला जातो. माणगावकरांना दररोज जवळपास ३५ लाख लिटर पाण्याचा पुरवठा होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोज पाणीपुरवठा करताना मध्येच येणारे तांत्रिक अडथळे तसेच विजेचा खंडित किंवा कमी-जास्त दाबाचा पुरवठा यामुळे पाणीपुरवठ्याच्या ठरलेल्या वेळापत्रकावर परिणाम होतो. या सगळ्या अडचणींवर मात करत नगरपंचायतीचा पाणीपुरवठा विभाग माणगावकरांना नियमित पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. विशेषतः पावसाळ्यात आणि उन्हाळ्याच्या शेवटी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेत होणाऱ्या बदलांमुळे शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना बरीच कसरत करावी लागते.
या गढूळ पाण्याच्या समस्येची दखल घेत माणगाव नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती अजित चंद्रकांत तार्लेकर यांनी बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी उतेखोल जलशुद्धीकरण केंद्रात तातडीची विशेष बैठक घेतली. या बैठकीला नगरपंचायतीचे कनिष्ठ अभियंता आकाश बुवा आणि संबंधित पाणीपुरवठा कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
बैठकीत पाणीशुद्धीकरण प्रक्रियेत आवश्यक ती विशेष काळजी घेऊनच नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच कनिष्ठ अभियंता आकाश बुवा यांनी शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले आणि शुद्धीकरण प्रक्रियेत अधिक दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.