सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:52 IST

देऊळगाव राजा ते खाल्याळ गव्हाण रस्त्यावरील पोल व वृक्षतोडीची चौकशी करण्याची मागणी

सामाजिक कार्यकर्ते समाधान दिलीप मिसाळ यांनी महावितरणच्या अकोला परिमंडळातील मुख्य अभियंत्यांकडे तक्रार निवेदन दिले आहे.

देऊळगाव राजा ते खाल्याळ गव्हाण रस्त्यावरील पोल व वृक्षतोडीची चौकशी करण्याची मागणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

देऊळगाव राजा ते खाल्याळ गव्हाण रस्त्याच्या कडेला महावितरण कंपनीमार्फत विद्युत पोल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामाचा दर्जा, नागरिकांची सुरक्षितता आणि त्यादरम्यान झालेली वृक्षतोड, या सगळ्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समाधान दिलीप मिसाळ यांनी केली आहे.

यासाठी त्यांनी महावितरणच्या अकोला परिमंडळातील मुख्य अभियंत्यांना तक्रार निवेदन दिले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अभियंता, अकोला आणि मुख्य वनसंरक्षक, अमरावती यांनाही देण्यात आल्या आहेत.

मिसाळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, कामाचा दर्जा, पोल कुठे उभारले जात आहेत आणि नागरिकांची सुरक्षितता याबाबत यापूर्वीही वारंवार तक्रारी झाल्या आहेत. कामादरम्यान झाडे तोडली गेल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

वारंवार तक्रारी करूनही संबंधित कंत्राटदारावर ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. देऊळगाव राजा येथील महावितरणचे संबंधित उपकार्यकारी अभियंता कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भूमिकेची कसून चौकशी करावी, तसेच आधीच्या तक्रारींवर काय कारवाई झाली, याचा लेखी खुलासा घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. चौकशीत संगनमत किंवा कर्तव्यात कसूर झाल्याचे सिद्ध झाले, तर संबंधितांवर नियमानुसार कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी मिसाळ यांनी केली आहे.

याशिवाय वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी आणि कामाची गुणवत्ता, सुरक्षितता व संबंधित नियमांचे पालन तपासावे, असेही निवेदनात सांगितले आहे.

वृक्षतोडीबाबत मिसाळ यांनी ठाम मागणी केली आहे की, या प्रकरणाची चौकशी करून तोडलेल्या झाडांच्या प्रमाणात नियमानुसार पुन्हा वृक्षारोपण करून घ्यावे. नव्याने लावलेल्या झाडांची निगा, पाणीपुरवठा आणि संरक्षण यांची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर निश्चित करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, म्हणून मुख्य वनसंरक्षक, अमरावती यांना निवेदनाची प्रत दिली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत आलेल्या तक्रारी, झालेली चौकशी आणि घेतलेले निर्णय यांची पडताळणी करून सविस्तर लेखी अहवाल द्यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनाच्या प्रती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक, अधीक्षक अभियंता बुलढाणा, जिल्हाधिकारी बुलढाणा, उपवनसंरक्षक बुलढाणा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बुलढाणा, तसेच मुख्य कार्यकारी अभियंता अकोला आणि मुख्य वनसंरक्षक अमरावती यांनाही देण्यात आल्या आहेत.

योग्य ती कार्यवाही झाली नाही, तर वरिष्ठ प्रशासकीय कार्यालयांकडे पुढील तक्रार केली जाईल आणि लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल, असा इशारा समाधान दिलीप मिसाळ यांनी दिला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ