सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
07:40 IST

वर्धा जिल्ह्यात दुष्काळाशी सामना, ५२१ ग्रामपंचायतींत जलताराची कामे

प्रत्येक ग्रामपंचायतीने जलताराची १०० कामे घ्यावीत, अशा सूचना वर्धा जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. यातून ८.३३ लाख मनुष्यदिन रोजगार निर्माण होणार आहे.

वर्धा जिल्ह्यात दुष्काळाशी सामना, ५२१ ग्रामपंचायतींत जलताराची कामे छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

वर्धा जिल्ह्यात यंदाच्या मान्सून काळात पाऊस कमी झाला. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील नागरिकांना कोरड्या दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. या कठीण परिस्थितीवर मात करायची आणि होतकरू लोकांच्या हाताला काम मिळावे, या हेतूने जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.

याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी पराग सोमण यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने जलताराची १०० कामे घ्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींमध्ये ही कामे झाल्यावर तब्बल ८.३३ लाख मनुष्यदिन रोजगार निर्माण होणार आहे.

पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संगोपन व्हावे आणि तो जमिनीत मुरावा, यासाठी जलतारा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरतो. दुष्काळाच्या झळा मजुरांनाही सोसाव्या लागणार आहेत. अशा वेळी दुष्काळाशी लढणे आणि भविष्यात पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सोमण यांनी या सूचना आठही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील आठही तालुक्यांत प्रामुख्याने ग्रामीण जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे होतकरूंना गावातच काम मिळणार आहे.

व्हीबीजी रामजी योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध कामे होणार आहेत. २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या काळात जिल्हा परिषद, म्हणजेच ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ११,४७९ कामे करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या कामांतून २० लाख ३७ हजार ४४० मनुष्यदिन रोजगार निर्माण होणार आहे. यातली जास्तीत जास्त कामे यंदाच्या दुष्काळी काळात पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे सांगण्यात आले.

दुष्काळी संकटाच्या काळात व्हीबीजी रामजी योजनेंतर्गत रोजगारासाठी पात्र ठरणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला काम देण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करणार आहे. नोंदणी केलेल्या मजुराने कामाची मागणी नोंदवताच त्यावर तातडीने कार्यवाही होऊन त्याला काम उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सध्या या योजनेंतर्गत जिल्ह्यात ८ हजार ७२२ विविध कामे प्रगतिपथावर आहेत. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने ५ हजार ७६२ कामांचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला असल्याचेही सांगण्यात आले.

वर्धा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. ज्ञानदा फणसे म्हणाल्या, "८८ दुष्काळाशी लढा देण्याच्या उद्देशाने जिल्हातील ५२१ ग्रामपंचायतींद्वारे प्रत्येकी १०० जलताराची कामे घेतली जाणार आहे. होतकरू ग्रामिणांना गावातच काम मिळावे हा त्यामागील उद्देश आहे. मागेल त्याला काम उपलब्ध करून दिले जाणार आहे."

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ