चंद्रपुरात रस्त्यावर सापडलेल्या दुर्मिळ कासवाला नागरिकांमुळे जीवदान
लालपेठ-बायपास महामार्गावर रस्त्याच्या मधोमध आढळलेल्या 'इंडियन फ्लॅपशेल' कासवाला नागरिकांच्या समयसूचकतेमुळे आणि वनविभागाच्या प्रयत्नांमुळे जीवदान मिळाले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपुरातील वर्दळीच्या रस्त्यावर सापडलेल्या एका दुर्मिळ 'इंडियन फ्लॅपशेल' (Indian Flap-shelled) कासवाला नागरिकांच्या समयसूचकतेमुळे जीवदान मिळाले आहे. पर्यावरणप्रेमी आणि सजग नागरिकांनी तसेच वनविभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे या मुक्या जिवाला सुखरूप नवे आयुष्य मिळाले आहे.
लालपेठ-बायपास महामार्गावरून जात असताना श्याम चक्रदेव यांना रस्त्याच्या मधोमध एक जिवंत कासव दिसले. या महामार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे कासवाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चक्रदेव यांनी क्षणाचाही विलंब न लावता कासवाला सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेतले आणि तातडीने त्याची माहिती वन्यजीव अभ्यासक अश्विन गोडबोले यांना दिली.
अश्विन गोडबोले यांनी तात्काळ पुढाकार घेऊन वनविभागाशी संपर्क साधला आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर मूल मार्गावरील वनविभागाच्या पारगमन उपचार केंद्रातील (TTC) पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी कृष्णा वाटेकर आणि महेश वाडगूरे यांनी कासवाला आपल्या ताब्यात घेतले.
वनविभागाच्या पथकाने कासवाची प्राथमिक आरोग्य तपासणी केली. अंदाजे १० वर्षे वयाचे हे कासव पूर्णपणे सुदृढ आणि निरोगी असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. वनविभाग लवकरच या कासवाला त्याच्या सुरक्षित आणि नैसर्गिक अधिवासात सोडणार आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'इंडियन फ्लॅपशेल' हे गोड्या पाण्यातील मऊ पाठीचे कासव आहे. त्याची पाठ चपटी, गोलाकार आणि चर्ममय म्हणजेच लेदरसारखी असते. विशेष म्हणजे, त्याच्या पाठीच्या खालच्या बाजूला त्वचेचे मऊ भाग असतात, ज्यांना 'फ्लॅप्स' म्हणतात. धोका निर्माण झाल्यास हे कासव त्या फ्लॅप्समध्ये आपले पाय आणि मान पूर्णपणे लपवू शकते.
हे कासव प्रामुख्याने भारतभरातील नद्या, तलाव, दलदली आणि शेतातील पाणी साचलेल्या भागात आढळते. नागरिकांच्या सजगतेमुळे एका मुक्या प्राण्याचा जीव वाचल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.