गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:26 IST

चाफेवाडी आश्रमशाळेच्या इमारतींच्या कामावर प्रश्नचिन्ह; विटा हातात तुटत असल्याची तक्रार

कर्जत तालुक्यातील चाफेवाडीच्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या नव्या इमारती आणि वसतिगृहाच्या कामाचा दर्जा खराब असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप गोरे यांनी केला आहे.

चाफेवाडी आश्रमशाळेच्या इमारतींच्या कामावर प्रश्नचिन्ह; विटा हातात तुटत असल्याची तक्रार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात चाफेवाडी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या नव्या इमारती आणि वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे. मात्र या कामाच्या दर्जावर आता गंभीर आक्षेप घेतले जात आहेत. वसतिगृहासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या विटा कच्च्या असून हातात घेतल्या की लगेच तुटतात, असे सांगितले जात आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप गोरे यांनी या बांधकामावर जोरदार आक्षेप घेतला आहे.

कर्जत हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. आदिवासी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी शासन आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शासकीय आश्रमशाळा चालवते. कर्जत तालुक्यात चाफेवाडी, भालीवडी, पिंगळस आणि पाथरज येथे अशा आश्रमशाळा आहेत. त्यातील चाफेवाडीच्या आश्रमशाळेची इमारत आणि वसतिगृह बांधण्याचे काम मंजूर व्हावे, यासाठी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शासन दरबारी प्रयत्न केले होते. त्यानंतर तीन मजली शाळा इमारतीसाठी सहा कोटी आणि वसतिगृह इमारतीसाठी सव्वा आठ कोटी रुपये मंजूर झाले. दोन्ही इमारतींसाठी मिळून साधारण १५ कोटींचा निधी मंजूर आहे.

आमदार थोरवे यांनी ही कामे मंजूर करून घेतली, पण प्रत्यक्षात काम करणारे ठेकेदार ठाणे जिल्ह्यातील आहेत. ठेकेदारांबरोबरच कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारीही ठाणे जिल्ह्याच्या बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. कर्जत तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय असताना, कर्जतमधील आश्रमशाळांच्या कामांची जबाबदारी ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कशी, असा प्रश्न आता पुढे आला आहे. रायगड जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या इमारती बांधल्या जात नाहीत.

ठाण्याहून अधिकारी कर्जतला कसे येणार, असा प्रश्न विचारला जात आहे. अधिकारी आश्रमशाळेत पाहणीसाठी येतच नसल्यामुळे वसतिगृह आणि शाळेच्या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे, असा आरोप आहे. तेथे बांधकामासाठी आणलेल्या विटा हातातून खाली पडल्या की लगेच तुटत आहेत, असे गोरे यांचे म्हणणे आहे.

वसतिगृह इमारतीच्या पोर्चचे काम सुरू असून तेथे खोल खड्डा आहे. रात्रीच्या अंधारात एखादा विद्यार्थी त्यात पडला, तर हाडे मोडल्याशिवाय राहणार नाहीत, असे सांगितले जात आहे. अशा कामाचे नियोजन करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेमके कसे नियोजन केले, असा जाहीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

आश्रमशाळेत शिकणारी मुले आदिवासी आहेत. निकृष्ट दर्जाचे बांधकाम भविष्यात कोसळले तर काय होणार, असा प्रश्न पालकांनी विचारला आहे. या कामामुळे इमारत कोसळली तर आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे बळी जाऊ शकतात, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

कर्जत तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळांच्या बांधकामांची पाहणी ठाणे जिल्ह्यातील अधिकारी करतात, असे प्रदीप गोरे यांनी सांगितले. आपल्या आमदारांनी असली खराब कामे रोखण्यासाठी तातडीने लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ