बुधवार, 7 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:57 IST

अलिबाग-रोहा रस्त्याचे काँक्रीट सात-आठ महिन्यांत खराब, पुन्हा खोदून काम सुरू

एमएसआयडीसीमार्फत झालेल्या अलिबाग-रोहा मार्गाच्या काँक्रीटीकरणातील काही भाग खराब झाल्याने तो फोडून पुन्हा बांधला जात आहे. कामाच्या दर्जाबाबत प्रवासी प्रश्न विचारत आहेत.

अलिबाग-रोहा रस्त्याचे काँक्रीट सात-आठ महिन्यांत खराब, पुन्हा खोदून काम सुरू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

अलिबाग-रोहा मार्गावरील काँक्रीटीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. आता त्याच मार्गावर आधी केलेला रस्ताच पुन्हा फोडून नव्याने काँक्रीट टाकण्याची वेळ आली आहे. एमएसआयडीसीच्या माध्यमातून बायपास ते सहाण आणि बायपास ते नागाव या पट्ट्यात काँक्रीट रस्ता बांधण्यात आला होता. त्यातले काही भाग खराब झाल्याने ते पॅच फोडून पुन्हा बांधले जात आहेत. त्यामुळे या मार्गाने रोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा आणि सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांचा वारंवार त्रास सहन करावा लागत आहे.

बायपास ते सहाण आणि पुढे नागावपर्यंतच्या काँक्रीट रस्त्याचे काम गेल्या वर्षी सुरू झाले होते. काम चालू असताना या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत होती. तरीही रस्ता चांगला होईल, या अपेक्षेने प्रवाशांनी हा त्रास सहन केला. मात्र अवघ्या सात-आठ महिन्यांतच रस्त्याचे काही भाग खराब झाल्याचे दिसून आले.

सुमारे महिनाभरापूर्वी सहाण-मोठी गाव ते बायपास दरम्यानचा खराब झालेला पॅच फोडून तिथे पुन्हा काँक्रीट टाकण्यात आले. पण नव्याने केलेल्या त्या भागाचीही लेव्हल नीट नसल्याची तक्रार आहे. त्या ठिकाणी रस्ता आजही खराब असल्याचे प्रवासी सांगतात. आता बायपास ते ढवर दरम्यानचा खराब झालेला पॅच फोडून तिथे नव्याने काँक्रीटीकरण केले जात आहे. म्हणजे वर्षभरापूर्वी केलेला रस्ता पुन्हा फोडून बांधावा लागत आहे.

हे काम रात्रीच्या अंधारात केले जाते आणि सकाळपर्यंत पूर्ण केले जाते. त्यामुळे कामाच्या पद्धतीबद्दलही प्रश्न उभे राहिले आहेत.

रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असताना काही महिन्यांतच रस्ता खराब होऊन तो पुन्हा फोडावा लागत आहे. त्यामुळे नागरिक कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न विचारत आहेत. आता नव्याने केलेले काँक्रीट किती काळ टिकणार, असा सवालही प्रवासी करत आहेत.

सतत सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक विस्कळीत होते आणि वाहनचालकांना तसेच प्रवाशांना विनाकारण त्रास होतो. म्हणून संबंधित विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी, कामाचा दर्जा तपासावा आणि काम निकृष्ट आढळले तर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रवाशांनी काही प्रश्नही मांडले आहेत. वर्षभरापूर्वी केलेला रस्ता पुन्हा फोडण्याची वेळ का आली, रस्त्याच्या कामात कोणत्या त्रुटी राहिल्या आणि आता नव्याने होत असलेले काम दर्जेदार आहे का, हे ते विचारत आहेत. या सगळ्याची जिल्हा प्रशासनाने चौकशी करावी आणि वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ