लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासाठी ३४४.६२ कोटींचा निधी वर्ग, लवकरच खात्यात पैसे
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ३४४.६२ कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केले आहेत.
महाराष्ट्रातील महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे सप्टेंबरचा हप्ता खात्यात कधी येणार, याकडे सगळ्या महिलांचे लक्ष लागले होते. आता त्यासाठीचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, लवकरच ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात वर्ग होण्याची दाट शक्यता आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सप्टेंबरच्या हप्त्याच्या वितरणासाठी 344.62 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केला आहे. हा निधी महिला व बालविकास विभागाकडे जमा झाल्यानंतर पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये टप्प्याटप्प्याने जमा व्हायला सुरुवात होईल. येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन महिलांना हप्त्याची रक्कम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून पैसे वर्ग झाले असल्यामुळे कोणत्याही क्षणी हा हप्ता लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यात जमा होऊ शकतो.
ही योजना जुलै 2024 मध्ये महायुती सरकारतर्फे सुरू करण्यात आली. सुरुवातीला सुमारे 2 कोटी 47 लाख महिलांची लाभार्थी म्हणून नोंद झाली होती. पण पारदर्शकता यावी आणि नियमांची नीट अंमलबजावणी व्हावी, म्हणून राज्य सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली. या पडताळणी मोहिमेदरम्यान अनेक महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही. काही महिलांना वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यामुळे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आले.
ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्यांच्या नावावर चारचाकी वाहने आहेत किंवा ज्या महिला नोकरी करतात, त्यांनाही योजनेतून वगळण्यात आले आहे. या सगळ्या कारणांमुळे योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची संख्या आता 1 कोटी 66 लाखांवर आली आहे. त्यामुळे सरकारवर येणारा आर्थिक ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल विरोधकांनी अनेकदा शंका उपस्थित केली होती. मात्र एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही योजना कधीही बंद होणार नाही, असा ठाम विश्वास महिलांना दिला होता. महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वातंत्र्य यासाठी ही योजना सतत सुरू ठेवली जाणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.