शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

गोंदियातील ५० नागरिक एकता नगरच्या राष्ट्रीय एकता दिन सोहळ्यासाठी गुजरातला रवाना

गोंदियातील ५० नागरिक एकता नगरच्या राष्ट्रीय एकता दिन सोहळ्यासाठी गुजरातला रवाना छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
समाज PT24 टीम

पूर्वी नक्षलग्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील ५० नागरिकांना ३१ ऑक्टोबरच्या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून बोलावण्यात आले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरात राज्यातील एकता नगर, केवडिया येथे भव्य 'राष्ट्रीय एकता दिन' सोहळा होणार आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे होणाऱ्या या सोहळ्यात गोंदिया जिल्ह्यातील ५० नागरिक सहभागी होणार आहेत.

देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्याचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष उपक्रमांतर्गत पूर्वी नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमधून प्रत्येकी ५० नागरिकांचे प्रतिनिधी मंडळ गुजरातला बोलावले आहे.

गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या समन्वयातून या गुजरात दौऱ्याचे नियोजन झाले आहे. पहिल्या टप्प्यात २७ ऑक्टोबर २०२६ रोजी नक्षल सेल, गोंदिया येथील पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते यांच्यासोबत ३ नागरिकांना एकता नगरला पाठवण्यात आले. त्यांचा २ दिवसांचा गुजरात दर्शनाचा कार्यक्रम सुरू आहे.

त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे आणि दीपक तरवडे यांच्यासोबत उरलेले ४७ नागरिक गुजरातला रवाना झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया दिनेश शुक्ला यांनी हिरवी झेंडी दाखवून या प्रवासाला सुरुवात करून दिली. अशा प्रकारे जिल्ह्यातून एकूण ५० जणांचे प्रतिनिधी मंडळ सोहळ्यात सहभागी होणार आहे.

एकेकाळी नक्षलवादामुळे भीती, असुरक्षितता आणि विकासातील अडथळ्यांना तोंड देणाऱ्या गोंदिया जिल्ह्याने आता शांतता, सुरक्षितता आणि प्रगतीच्या दिशेने महत्त्वाची वाटचाल केली आहे. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने नक्षलवाद संपवण्यासाठी सुरक्षा, विकास आणि पुनर्वसनाचे जे सर्वसमावेशक उपाय केले, त्यामुळे जिल्ह्यात सकारात्मक बदल झाल्याचे सांगण्यात आले.

अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल भागांमध्ये रस्ते, मोबाईल नेटवर्क, वीज, पाणी, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक आणि इतर मूलभूत सुविधा वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा शासनाशी संपर्क अधिक घट्ट झाला. विविध विकास योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचू लागल्याने ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.

या बदलात गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या 'पोलीस दादालोरा खिडकी' या कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमाची भूमिका महत्त्वाची आहे. या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, कौशल्य विकास, आरोग्य सुविधा आणि इतर लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आणि नागरिकांमधील विश्वास वाढवणे, तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि समाजाला नक्षलवादाच्या प्रभावापासून दूर ठेवणे, हा या उपक्रमांचा उद्देश आहे.

केंद्र शासनाने ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याचा संकल्प केला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत माहितीनुसार, ३१ मार्च २०२६ रोजी देश नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर पूर्वी नक्षलप्रभावित असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांना सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून बोलावणे हा शांतता, लोकसहभाग आणि विकासाच्या प्रवासाचा गौरव करणारा उपक्रम आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील विविध संस्थाने एकत्र आणून अखंड भारताच्या निर्मितीत ऐतिहासिक योगदान दिले. त्यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथील सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे म्हटले आहे. हा सहभाग केवळ गुजरात दौरा नसून शांतता, सुरक्षितता, विकास, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचेही सांगण्यात आले.

या उपक्रमाबद्दल गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिनिधी मंडळाने केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, संबंधित यंत्रणा आणि पोलीस दलाचे आभार मानले आहेत. 'नक्षलमुक्त गोंदिया, सुरक्षित गोंदिया आणि विकसित गोंदिया या संकल्पनेला बळ देत जिल्ह्यात शांतता, विश्वास आणि विकासाची वाटचाल अधिक भक्कम करण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे,' अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली.

#नागपूर#समाज#PT24#Society#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ