आरे कॉलनीतील 'ओम आर्ट सेंटर'ला शासनाचे पाठबळ; सुनेत्रा पवारांची ग्वाही
आरे कॉलनीत 'शिल्परंग-१२' या राष्ट्रीय कला परिसंवादाचे उद्घाटन झाले. यावेळी २१ चित्रकार व शिल्पकारांचा सन्मान करण्यात आला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आरे कॉलनी येथे उभारल्या जात असलेल्या 'ओम द ग्लोबल आर्ट सेंटर' आणि 'आरे म्युझियम' या प्रकल्पाला शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले. कलाकार, कला आणि कलाशिक्षणाला प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, असे त्या म्हणाल्या. या केंद्रामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आरे कॉलनीतील निसर्गरम्य परिसरात आयोजित 'शिल्परंग-१२' या राष्ट्रीय कला परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार रवींद्र वायकर, वित्त विभागाचे सहसचिव संजय इंगळे, आरे मिल्क कॉलनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत शिपूरकर, तसेच 'ओम द ग्लोबल आर्ट सेंटर' आणि 'आरे म्युझियम'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र बोरलेपवार आणि मयुरी बोरलेपवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाल्या की, अजिंठा-वेरूळच्या लेण्यांपासून वारली चित्रकलेपर्यंत आणि आधुनिक चित्रकला व शिल्पकलेपर्यंत महाराष्ट्राला समृद्ध कलापरंपरा लाभली आहे. कला केवळ सौंदर्याची अनुभूती देत नाही, तर माणसाला विचार करायला शिकवते, संवेदनशील बनवते आणि समाजाला एकत्र जोडते.
'ओम' केंद्रामुळे देशभरातील कलाकारांना प्रदर्शनासोबतच एकत्र राहून कलानिर्मिती करण्याची, नवे प्रयोग करण्याची आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. 'शिल्परंग'सारख्या उपक्रमांमुळे विविध राज्यांतील कलाकार एकत्र येतात आणि भारतीय सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवतात. युवा कलाकारांनी आपल्या कलेवर विश्वास ठेवून नवे प्रयोग करावेत, आपल्या मातीशी नाते जपत जागतिक विचारांशी संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कला क्षेत्रातील महिलांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद करून पवार म्हणाल्या की, अधिकाधिक मुलींना कलाशिक्षण, कलानिर्मिती आणि व्यावसायिक संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. कला क्षेत्राला राजाश्रय मिळणे गरजेचे आहे, म्हणून कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांच्यासोबत सकारात्मक प्रयत्न केले जातील. दृश्य कला (व्हिज्युअल आर्ट्स) हा विषय सांस्कृतिक कार्य विभागाकडे वर्ग करण्यासाठीही सकारात्मक प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलानिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राजाश्रय वाढवून त्यांच्या संकल्पनांना भक्कम पाठबळ देण्याची गरज आहे. भारतीय चित्रकला आणि शिल्पकलेची परंपरा समृद्ध आहे. तिचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कला क्षेत्र, शासन आणि समाज यांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत. दृश्य कला आणि सादरीकरण कला या दोन्हींचा समतोल विचार करून दृश्य कलांना अधिक व्यापक व्यासपीठ मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले.
शेलार यांच्या म्हणण्यानुसार, 'ओम द ग्लोबल आर्ट सेंटर' आणि 'आरे म्युझियम' येथे साकारलेल्या शिल्पांमध्ये केवळ मूर्त स्वरूप नाही, तर त्यामागे भावनिक, संवेदनशील आणि नैसर्गिक आशय दडलेला आहे. कलाकृतीचे सौंदर्य अनुभवण्याबरोबरच त्यामागील विचार, भावना आणि तत्त्वज्ञान समजून घेणेही महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्यासह अनेक कलाकारांनी रंगांतून व्यापक विचार मांडण्याची परंपरा जपली आहे, असेही त्यांनी सांगितले. भारतीय जीवनपद्धती, अध्यात्म आणि संस्कृतीमध्ये रंगांना विशेष महत्त्व आहे आणि रंगसंगतीचा संबंध मानवी भावना, संवेदना व तत्त्वज्ञानाशी आहे, असे ते म्हणाले. चित्रकारांनी भारतीय परंपरा, विचार आणि जीवनदृष्टी आपल्या कलाकृतींतून प्रभावीपणे मांडावी, तर शिल्पकलेने लेणी, वास्तू आणि विविध कलाकृतींतून भारतीय संस्कृतीला आकार दिला आहे; या परंपरेशी नव्या पिढीचे नाते जोडण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
'शिल्परंग-१२' मध्ये देशाच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या २१ चित्रकार व शिल्पकारांचा शाल आणि प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. त्यात विनोद शर्मा, सुहास बहुलकर, चरण शर्मा, जॉन डगलस, निलेश वेडे, प्रदीप जोगदंड, रमेश चंद्र, साक्षी कदम, आनंद पांचाळ, सिद्धार्थ शिंगाडे, नितीन मिस्त्री, अमरनाथ शर्मा, प्रदीप कामिया, नीना देवांगन, वैभव मोरे, जगन्नाथ महापात्रा, दिलीप शर्मा, योगेश मुरकुटे, मान काफर, रविकुमार आणि केतन खुटले यांचा समावेश होता.
याच कार्यक्रमात ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्या चित्राचे अनावरण झाले. कार्यक्रमस्थळी साकारलेल्या शिल्पांची पाहणी करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कलाकारांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.