नवरात्र मंडपात मंडळाच्या अध्यक्षाने रिव्हॉल्व्हर काढल्याने कोल्हापुरात खळबळ; विजयकुमार पाटील यांना अटक
शाहूनगरमधील नवरात्रोत्सवाच्या मंडपात आरतीच्या निमंत्रणावरून झालेल्या वादानंतर रिव्हॉल्व्हरमधून एक राऊंड फायर झाला; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही, राजारामपुरी पोलिसांनी अध्यक्षांना अटक केली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कोल्हापुरातील शाहूनगर परिसरात नवरात्रोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच मंडपात रिव्हॉल्व्हरमधून एक राऊंड फायर झाल्याने खळबळ उडाली. मानपान आणि आरतीच्या निमंत्रणावरून झालेल्या वादातून मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार शंकरराव पाटील यांनी मंडपात रिव्हॉल्व्हर काढून गोळीबार केल्याचा आरोप आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. राजारामपुरी पोलिसांनी पाटील यांना अटक केली असून रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे.
शाहूनगरमधील दत्त गल्ली येथे राजर्षी शाहू फ्रेंड सर्कलच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. पाटील या मंडळाचे अध्यक्ष आहेत. नवरात्रोत्सवादरम्यान संध्याकाळच्या आरतीसाठी मंडळातील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवर्जून बोलावले जाते. यंदा सुधीर खेबुडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना आरतीचे निमंत्रण देण्यात आले नाही, त्यामुळे मंडळात अंतर्गत वादाला तोंड फुटले.
मंगळवारी रात्री हा वाद मिटवण्यासाठी मंडळातील काही कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यावेळी खेबुडे यांनी सिद्धेश थोरवत यांना त्यांच्या कुटुंबीयांना आरतीसाठी का बोलावले नाही, अशी विचारणा केली. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाची माहिती अध्यक्ष पाटील यांना मिळाल्यानंतर वातावरण आणखी तणावपूर्ण झाले.
दरम्यान, खेबुडे आणि काही कार्यकर्ते बाजूला जाऊन थांबले होते. ते आपल्याबद्दलच बोलत आहेत, असा गैरसमज झाल्याने पाटील संतापले.
संतापाच्या भरात पाटील यांनी रिव्हॉल्व्हर बाहेर काढली. त्यांना रोखण्यासाठी काही कार्यकर्ते धावत पुढे आले. त्या झटापटीत त्यांच्या हातातील रिव्हॉल्व्हरमधून एक राऊंड फायर झाला. गोळी जमिनीच्या दिशेने गेल्याने सुदैवाने कोणालाही लागली नाही. पण गोळीचा मोठा आवाज झाल्याने नवरात्रोत्सवाच्या मंडपात आणि आजूबाजूच्या परिसरात एकच धावपळ उडाली. ऐन उत्सवाच्या काळात मंडपातच गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ माजली.
घटनेनंतर मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास मंडळातील काही पदाधिकाऱ्यांनी आपापसात वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र राजारामपुरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनेची शहानिशा करून गुन्हा दाखल केला.
सुधीर दत्तात्रय खेबुडे (वय ३६, रा. शाहूनगर) यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी विजयकुमार शंकरराव पाटील (वय ५९, रा. प्रतिभानगर, सध्या न्यू पॅलेस परिसर) यांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरही पोलिसांनी जप्त केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.