नवी मुंबईत नवरात्रोत्सव मंडपांत जुगाराचे अड्डे चालत असल्याची चर्चा, नागरिकांचे पोलिसांना सवाल
नवरात्रोत्सवाच्या मंडळांच्या मंडपांत रात्री जुगार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे, तक्रारींनंतरही पोलिसांची कारवाई होत नसल्याचा त्यांचा दावा आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नवी मुंबईत सध्या नवरात्रोत्सवाचा मोठा उत्साह दिसत आहे. देवीच्या भक्तीत सगळे रमलेले असताना शहरातील अनेक भागांतून एक गंभीर प्रकार पुढे आल्याचे सांगितले जात आहे. नवरात्रोत्सवाच्या मंडळांमध्ये आणि गल्लीबोळांत जुगाराचे अड्डे सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. गणेशोत्सवातही असेच घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी मंडळांच्या मंडपात किंवा मंडपाच्या आडोशाने जुगाराचे टेबल मांडले जात आहेत. हे खेळ चालवणारे व्यावसायिक असून, उत्सवाचा गैरफायदा घेऊन ते सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंडळांच्या आश्रयाने हा धंदा चालवतात, असा आरोप आहे. काही मंडळांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जुगाराला स्पष्ट नकार दिला आहे. मात्र अनेक ठिकाणी आर्थिक मोबदला आणि देणगीच्या नावाखाली हा खेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याचे बोलले जात आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जुगाराची तक्रार नियंत्रण कक्षाला दिली की बीट मार्शल पोलीस घटनास्थळी केवळ औपचारिकता म्हणून फेरफटका मारायला जातात. मंडळाजवळ पोहोचल्यावर ते फक्त देवी लक्ष्मी दर्शन घेऊन माघारी फिरतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा जुगार चालवणारे मुख्य सूत्रधार खालपासून वरपर्यंत साहेबांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे कसलेही टेन्शन घेऊ नका, असे उघडपणे सांगतात. त्यामुळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि गुन्हे शाखा या प्रकाराची गांभीर्याने दखल घेणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. आयुक्तांनी या प्रकरणाची गुप्त चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, याकडे संपूर्ण नवी मुंबईचे लक्ष लागले आहे.
जुगाराचा हा विळखा कर्करोगासारखा तरुणाईला उद्ध्वस्त करत असल्याचे नागरिक म्हणतात. रात्रीच्या वेळी अड्ड्यांवर होणारी उलाढाल आणि मद्यधुंद तरुणांचा वावर यामुळे वाद, हाणामारी आणि धमक्या यांसारख्या गंभीर घटना घडतात. त्यामुळे भक्तीसाठी सुरू असलेल्या सार्वजनिक उत्सवांची नावे बदनाम होत आहेत. देणगीसाठी जुगाराचा पैसा स्वीकारणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न सुजाण नागरिक विचारत आहेत.
नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांवर फटाके वाजवल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या स्पष्ट आदेशाचे कारण देत पोलिसांनी ती कारवाई केली. ती योग्यच आणि पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी असल्याचे म्हटले आहे. मात्र आज नवरात्रोत्सवात जिथे सर्रास आणि मोठ्या प्रमाणावर जुगाराचे अड्डे थाटले जात आहेत, तिथे तीच पोलीस यंत्रणा बघ्याची भूमिका घेत आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.
लक्ष्मी दर्शन झाल्यामुळे कारवाई टाळली जात आहे का, की वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश केवळ सर्वसामान्यांवर आणि छोट्या गोष्टींवरच चालतात, असा संतप्त सवाल नवी मुंबईतील नागरिक विचारत आहेत. फटाक्यांवर कठोर कारवाई करणारे पोलीस जुगाराच्या अड्ड्यांवर गप्प का बसले आहेत, याचे उत्तर जनतेला हवे आहे.