शिंदे आमचे बॉस, पण शिवसेनेत प्रवेश नाही; केबल संघटनेतील पदानंतर युनूस शेख यांचा खुलासा
एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी केबल संघटनेतील पदानंतर पक्षप्रवेशाची चर्चा फेटाळली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ठाण्याच्या राजकारणात सध्या गोंधळाचे वातावरण दिसत आहे. ठाकरे सेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील राजकारण तापलेले असताना आता आणखी एक अजब राजकीय प्रकार समोर आला आहे.
ठाण्यातील 'मुंब्रा हरा कर देंगे' फेम एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांची एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित एका पदावर नियुक्ती झाली आहे. या बातमीमुळे ठाण्यातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
युनुस शेख यांना एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित केबल संघटनेत कळवा-मुंब्रा परिसराचे अध्यक्षपद मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला का, असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र आपण अजूनही एमआयएममध्येच असून शिवसेनेत प्रवेश केलेला नाही, असे युनूस शेख यांनी स्पष्ट केले आहे.
युनूस शेख यांच्या म्हणण्यानुसार, केबल आणि इंटरनेटचा व्यवसाय हा त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा व्यवसाय आहे. केबल व्यावसायिकांसाठी एमआयएमची स्वतंत्र संघटना नसल्याने आपण केबल ऑपरेटरच्या संघटनेशी जोडले गेलो, असे त्यांनी सांगितले.
या संघटनेत कळवा-मुंब्रा परिसराचे अध्यक्षपद मिळाले असले, तरी त्याचा अर्थ आपण शिवसेनेत प्रवेश केला असा होत नाही, असे ते म्हणाले. पक्षप्रवेश करायचा असता, तर एकनाथ शिंदे यांच्या हातून थेट नियुक्तीपत्र स्वीकारले असते, असेही त्यांनी म्हटले.
यावेळी युनुस शेख यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुकही केले. एकनाथ शिंदे साहेब हे सर्वांचेच बॉस आहेत, आमचेही बॉस आहेत, शिंदे यांच्यासोबत गेल्यास फायदाच होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच शिंदे यांच्याशी असलेल्या जुन्या संबंधांचाही त्यांनी उल्लेख केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कुटुंबाचे एकनाथ शिंदे यांच्याशी सुमारे ४० वर्षांपासून संबंध आहेत. संकटाच्या काळात एकनाथ शिंदे आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मदत केल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे नियुक्तीपत्र मिळाले किंवा पक्षाचे चिन्ह असलेला गमछा घातला, म्हणजे पक्षप्रवेश झाला असे होत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले जुने संबंध आणि केबल व्यवसायामुळे आपण संघटनेशी जोडले गेलो. शिंदे यांनी भविष्यात आणखी एखादी जबाबदारी दिल्यास त्याबाबत विचार करू, असेही ते म्हणाले.
दरम्यान, युनुस शेख यांच्या नियुक्तीमुळे ठाण्यात राजकीय चर्चांना सुरुवात झाली असली, तरी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा नाकारला आहे. त्यामुळे त्यांच्या संघटनात्मक भूमिकेबाबत आणि एमआयएमशी असलेल्या संबंधांबाबत पुढे काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.