मुंबई-ठाणे परिसरात पुढील 15 ते 20 वर्षांत 30 लाख घरे उभारणार: एकनाथ शिंदे
ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजनावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.
मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) नागरिकांना हक्काचं घर मिळावं आणि अनधिकृत, धोकादायक इमारतींचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढच्या 15 ते 20 वर्षांत मुंबई-एमएमआर परिसरात तब्बल 30 लाख नवी घरं बांधली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबई, ठाणे यांच्यासह मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या शहरांमध्ये क्लस्टर योजनांना गती देण्याचं सरकारचं स्पष्ट धोरण असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. युनिफाईड डीसीपीआर (UDCPR) मध्ये केलेल्या बदलांमुळे क्लस्टर आणि एसआरए (SRA) प्रकल्पांना मोठा वेग मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलं.
ठाण्यात सुमारे 20 हेक्टर म्हणजे 50 एकर परिसरात हा महा-क्लस्टर प्रकल्प उभा राहणार असून, यातून 6 हजार कुटुंबांना सुरक्षित आणि दर्जेदार घरं मिळणार आहेत. ही योजना केवळ इमारती बांधण्यापुरती मर्यादित नसून एकात्मिक टाऊनशिपच्या स्वरूपात असणार आहे. रुंद रस्ते, पुरेसा पाणीपुरवठा, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनाची आधुनिक सोय, बागा, मैदानं, कम्युनिटी हॉल, जिम, योगा सेंटर, इनडोअर गेम्स, डिजिटल लायब्ररी, डे-केअर सेंटर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र अशा एकूण 23 सुविधा यात असतील. 'सिटी विथिन द सिटी' या संकल्पनेवर हा परिसर विकसित होत असून, 'वॉक टू वर्क' या संकल्पनेनुसार इथे व्यावसायिक विकासही केला जाणार आहे, ज्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
ठाण्यातल्या मोडकळीस आलेल्या इमारतींमधल्या दुर्घटनांचा दाखला देत शिंदे म्हणाले की, हा क्लस्टर प्रकल्प प्रत्यक्षात येण्यामागे तब्बल 20 वर्षांचा संघर्ष आहे. किसननगरमधील साईराज इमारत दुर्घटनेसह अनेक घटनांनंतर आपण उपोषणं, मोर्चे काढले आणि विधानसभेत हा प्रश्न सातत्याने मांडला, असं त्यांनी सांगितलं. नगरविकास मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री या पदांवर असताना धोरणातील सगळे अडथळे दूर करून हा प्रकल्प मार्गी लावल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं. किसननगरमधील पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होत आलं असून लवकरच रहिवाशांना घरांच्या चाव्या दिल्या जातील, असं ते म्हणाले.
रहिवाशांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे संकेत देत शिंदे यांनी कॉर्पस फंड, अतिरिक्त 100 चौरस फुटांची जागा परवडणाऱ्या दरात देणं आणि छोट्या दुकानदारांचं पुनर्वसन या मुद्द्यांवर भर दिला. "विकासकांनी दोन पैसे कमी नफा कमावला तरी चालेल, पण नागरिकांच्या घरांच्या दर्जात कोणतीही तडजोड किंवा कपात करू नका," अशी स्पष्ट सूचना त्यांनी विकासकांना दिली. हरिवंश राय बच्चन यांच्या 'कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती' या ओळींचा संदर्भ देत त्यांनी या प्रकल्पाचं महत्त्व अधोरेखित केलं.
मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग या प्रकल्पांमुळे ठाण्याच्या पायाभूत सुविधांना नवं रूप मिळणार असून, क्लस्टरमधील इमारतीही तितक्याच आधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.