ठाण्यात सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे भूमिपूजन; ६ हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिकेच्या क्लस्टर योजनेचे भूमिपूजन, मुंबई-एमएमआरमध्ये पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे बांधण्याची घोषणा.
ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी मुंबई-एमएमआर परिसरात पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली. मुंबई आणि ठाण्यासोबतच मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या शहरांमध्येही क्लस्टर योजनेला चालना देण्याचे राज्य सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. युनिफाइड डीसीपीआरमध्ये झालेल्या बदलांमुळे क्लस्टर आणि एसआरए प्रकल्पांना गती मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
ठाण्यातील सुमारे ६ हजार कुटुंबांना सुरक्षित आणि दर्जेदार घरे मिळणार असून, त्याचसोबत २३ नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित टाऊनशिप उभारून नव्या ठाण्याचा पाया रचण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला. सुमारे २० हेक्टर म्हणजेच ५० एकर परिसरात हे क्लस्टर विकसित होणार आहे. यात केवळ निवासी इमारती नव्हे, तर मोठे रस्ते, मुबलक पाणी, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, बगीचा, मैदान, कम्युनिटी हॉल, जिम, योगा सेंटर, इनडोअर गेम्स, डिजिटल लायब्ररी, डे-केअर सेंटर, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र आणि स्मार्ट स्ट्रीट लाइटिंगसारख्या सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. 'सिटी विथिन द सिटी' या संकल्पनेतून हा विकास होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या दुर्घटनांचा उल्लेख करत शिंदे यांनी सांगितले की क्लस्टरचा हा प्रवास २० वर्षांच्या संघर्षातून पुढे आला आहे. किसननगरमधील साईराज इमारत दुर्घटनेसह इतर अनेक दुर्घटनांनंतर धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर त्यांनी उपोषण, मोर्चे आणि विधानसभेत सातत्याने आवाज उठवला होता. नगरविकास मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री या नात्याने धोरणातील अडथळे दूर करत क्लस्टर प्रत्यक्षात आणल्याचे त्यांनी सांगितले. किसननगरमधील पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे असून लवकरच रहिवाशांना घरांच्या चाव्या दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निवासी बांधकामासोबत कमर्शियल विकास आणि स्थानिक रोजगारनिर्मितीवरही शिंदे यांनी भर दिला. "घरातून उतरायचे आणि जवळच कामाला जायचे" या 'वॉक टू वर्क' संकल्पनेतून स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सिद्धेश्वर तलाव परिसराचा पुनर्विकास होऊन तलावाची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
रहिवाशांच्या मागण्यांबाबत बोलताना कॉर्पस फंड, अतिरिक्त १०० चौरस फुटांची जागा परवडणाऱ्या दरात देणे आणि छोट्या दुकानदारांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याचे संकेत शिंदे यांनी दिले. "दोन पैसे कमी नफा झाला तरी चालेल, पण नागरिकांच्या घरांच्या दर्जात कपात करू नका," अशी स्पष्ट सूचना त्यांनी विकासकांना केली आणि सरकार व महापालिकेकडून आवश्यक सहकार्य दिले जाईल असे आश्वासन दिले.
मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे-बोरिवली बोगदा यांसारख्या प्रकल्पांमुळे ठाण्याच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार असल्याचे सांगत, क्लस्टरमधील इमारतीही दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. आयकॉनिक इमारतींसाठी प्रोत्साहनात्मक एफएसआयची तरतूद असल्याचेही त्यांनी सांगितले.
"क्लस्टर म्हणजे केवळ घर नव्हे, तर चांगले घर, चांगल्या सुविधा, रोजगार आणि बदललेले जीवनमान," असा संदेश देत शिंदे यांनी हरिवंश राय बच्चन यांच्या 'कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती' या ओळींचा दाखला दिला. भाषणाच्या अखेरीस त्यांनी विकासकांना मिश्किलपणे सूचना केली की, नागरिकांना वेळेत घरे देतानाच चांगल्या सुविधांसोबत मोठा टीव्हीही भेट म्हणून द्यावा.