सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 184 | Moderate 14:38 IST

कर्जतमध्ये शिंदे गटाला धक्का, गणेश मुंढे समर्थकांसह उबाठात दाखल

कर्जत वेणगाव परिसरातील प्रसिद्ध उद्योजक गणेश मुंढे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना उबाठा पक्षात जाहीर प्रवेश केला.

कर्जतमध्ये शिंदे गटाला धक्का, गणेश मुंढे समर्थकांसह उबाठात दाखल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कर्जत वेणगाव परिसरात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांचे जावई आणि प्रसिद्ध उद्योजक गणेश मुंढे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उबाठा पक्षात जाहीर प्रवेश केला.

प्रवेशानंतर बोलताना गणेश मुंढे म्हणाले, "आम्ही उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने शिवसैनिकांच्या विचारांशी प्रामाणिक राहून काम करण्यासाठी स्वगृही आलो आहोत. आगामी काळात पक्षाच्या वाढीसाठी पूर्ण ताकदीने झटणार." उपनेते बबन पाटील यांनी सर्व प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले आणि पक्षात त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असा शब्द दिला.

शिवसेना उबाठा पक्षाच्या 'शिवालय' कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक आणि पक्षप्रवेश सोहळा झाला. या वेळी उपनेते बबन पाटील, मावळ संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुवर्णा जोशी, जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे, उपसभापती चित्रा ठाकरे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी टोरंट प्रकल्पावरून जोरदार टीका केली. ते म्हणाले, "हल्ली आमदारांना शिवसेनेबद्दल जास्तच प्रेम वाटू लागले आहे. मात्र ते गोव्याला टेबलावर नव्हे तर शिवसैनिकांच्या हृदयावर नाचले, तेव्हा शिवसैनिक आठवले नाहीत. हे आम्ही विसरू शकत नाही. टोरंटला सर्व थरांतून विरोध होत आहे. या प्रकल्पासाठी लाखो झाडांची कत्तल होणार आहे. त्यामुळे तालुका भकास होणार आहे."

५०-५० च्या मुद्द्यावरूनही सावंत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले, "मध्यंतरी फिफ्टी फिफ्टीचा आवाज ऐकू आला होता. आम्ही त्यामध्ये नाही. निष्ठावंत शिवसैनिक कधीच मॅनेज होणार नाही. आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. गणेश मुंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे आपली ताकद निश्चित वाढणार आहे." भविष्यातही विविध ग्रामपंचायतींमधून प्रमुख कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. दिवाळीनंतर मोठा मेळावा आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

बबन पाटील यांनी आवाहन केले की, "शिवसेना हा अथांग समुद्र आहे, काहीजण गेल्याने फरक पडत नाही. ज्यांना पश्चाताप झाला आहे, त्यांनी लवकरात लवकर स्वगृही यावे." टोरंट प्रकल्पाविरोधात उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र लढा उभारला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

पाटील पुढे म्हणाले, "नियत कोणालाही सोडत नाही. ज्यांना आपण मोठे केले, ते सोडून गेले, त्यांची अवस्था बिकट होणार आहे. शिवसैनिकांनी काळजी करू नका, शिवसेनेचे सुवर्णदिन लवकरच येत असून टोरंट प्रकल्पाविरोधात आम्ही संपूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरू."

आगामी निवडणुकीत कर्जत, पनवेल आणि पेणमधून शिवसेनेचे आमदार विजयी होतील, असा विश्वास मनोहर भोईर यांनी व्यक्त केला. शिवसेना हा विचारांचा पक्ष असून मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन प्रसाद भोईर यांनी केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ