कराडजवळ उड्डाणपुलावर स्कॉर्पिओची ट्रकला मागून धडक; महालक्ष्मीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या चौघा तरुणांचा जागीच
पुणे-बेंगलोर महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला, तिघे गंभीर जखमी आहेत. सर्वजण कातरखटाव (ता. खटाव) येथील आहेत.
सातारा जिल्ह्यातील कराड शहराजवळ पुणे-बेंगलोर महामार्गावर नव्याने बांधलेला सहापदरी उड्डाणपूल आहे. या पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन हे सात तरुण स्कॉर्पिओ गाडीने गावाकडे परतत होते. त्यांच्या गाडीची ट्रकला मागून धडक बसली.
हा उड्डाणपूल काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या नव्या पुलावर घडलेला हा पहिलाच अत्यंत भीषण अपघात ठरला आहे.
खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील हे तरुण दसऱ्यानिमित्त कोल्हापूरला आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी स्कॉर्पिओने गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते रात्री गावाकडे निघाले. रात्री सुमारे ११ वाजता कराड शहराजवळच्या नव्या सहापदरी उड्डाणपुलावर त्यांच्या स्कॉर्पिओची ट्रकला मागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओचा अक्षरशः चुराडा झाला.
या दुर्घटनेत गाडीचा चालक तेजस देशमुख (२५), सागर निंबाळकर (२३), सुयश चिंचकर (२०) आणि रोहित धोत्रे (२१) यांचा जागीच मृत्यू झाला. ऋतुराज दुबळे (२१), शंतनू शिंगाडे (२०) आणि अमन तांबोळी (२३) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातातील सर्व तरुण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे रहिवासी आहेत. एकाच गावातील चार तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघाताची माहिती मिळताच कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, तसेच कराड वाहतूक शाखेचे संदीप साळुंखे, संग्राम पाटील, अमृत बाबर, दस्तगीर आगा, राहुल कदम आणि सचिन देवकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. पोलीस आणि नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक नंतर सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी कराड पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.