कराडच्या हेळगावात रस्त्याच्या वादातून रक्तरंजित हाणामारी, तरुणाचा मृत्यू
कराड तालुक्यातील हेळगावात रस्त्याच्या वाटेवरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत सूरज भरत सूर्यवंशी या २८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. कुऱ्हाड, कोयता आणि लाकडी दांडक्यांचा वापर झालेल्या या हल्ल्यात आणखी काही जण जखमी झाले असून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कराड तालुक्यातील हेळगाव गावात रविवारी सकाळी रस्त्याच्या वाटेवरून सुरू असलेल्या भांडणाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले आणि त्यात एका तरुणाचा जीव गेला. सकाळी सव्वानऊच्या सुमारास प्रज्वल किसन सूर्यवंशी यांच्या घरासमोर दोन गट एकमेकांसमोर आले आणि पाहता पाहता कुऱ्हाड, कोयता, लोखंडी टोचा आणि लाकडी दांडक्यांनी एकमेकांवर वार सुरू झाले.
या हाणामारीत सूरज भरत सूर्यवंशी (वय २८) याचा जागीच निर्घृण खून झाला. दोन्ही बाजूंचे मिळून अनेक जण या हल्ल्यात जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी महिलांसह एकूण दहा जणांवर खुनासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीतील आरोपानुसार, श्रीमंत रामचंद्र सूर्यवंशी हातात कुऱ्हाड घेऊन आला होता, तर आयुष विठ्ठल सूर्यवंशी याच्याकडे लोखंडी टोचा आणि ओंकार उत्तम सूर्यवंशी याच्याकडे कोयता होता. विठ्ठल रामचंद्र सूर्यवंशी आणि रामचंद्र महादेव सूर्यवंशी हे लाकडी दांडके घेऊन तिथे पोहोचले होते. या सगळ्यांनी आणि इतर काही जणांनी एकत्र येऊन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या गटाच्या तक्रारीनुसार, सूरज भरत सूर्यवंशी हा घराशेजारील बाथरूममधून घरात येत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. भांडण मिटवण्यासाठी मध्ये पडलेल्या लोकांवरही कुऱ्हाड, कोयता, दांडके आणि दगडांनी हल्ला झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात प्रज्वल किसन सूर्यवंशी, सौरभ भरत सूर्यवंशी, यश शशिकांत सूर्यवंशी, रेखा शशिकांत सूर्यवंशी आणि रोहिणी भरत सूर्यवंशी हे जखमी झाल्याची नोंद पोलिसांत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच मसूर पोलीस स्टेशनचे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी मसूर पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास मसूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्रीच याच कुटुंबातील लोकांमध्ये रस्त्याच्या वादावरून बाचाबाची झाली होती. त्यावेळी पोलिसांकडे तक्रारही देण्यात आली होती, त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंना बोलावून समज दिली होती. मात्र रविवारी सकाळी हाच वाद पुन्हा उफाळून आला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत होऊन एका तरुणाचा बळी गेला. इन कॅमेरा पोस्टमार्टम पूर्ण झाल्यानंतर सुरजचा मृतदेह हेळगावात आणण्यात आला आणि शोकाकुल वातावरणात रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.