सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
07:44 IST

मसूरची १४ कोटींची जलजीवन योजना पूर्ण, तरी घरात पाणी नाही; जगदाळेंचा १५ दिवसांचा इशारा

कराड तालुक्यातील मसूरची जलजीवन मिशनअंतर्गत योजना पूर्ण होऊनही ग्रामस्थांना पाण्यासाठी झगडावे लागत आहे. प्रशासनाने १५ दिवसांत प्रश्न न सोडवल्यास महिलांचा हंडा मोर्चा काढण्याचा इशारा मानसिंगराव जगदाळे यांनी दिला.

मसूरची १४ कोटींची जलजीवन योजना पूर्ण, तरी घरात पाणी नाही; जगदाळेंचा १५ दिवसांचा इशारा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कराड येथील सुमारे १४ कोटी रुपयांची जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली आहे. तरीही ग्रामस्थांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रशासनाने पाणी प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

संबंधित प्रशासनाने १५ दिवसांत हा प्रश्न सोडवला नाही, तर महिलांचा हंडा मोर्चा काढू, असा इशारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिला. या वेळी सह्याद्री कारखान्याचे संचालक दिनकरराव शिरतोडे, महेश घाडगे, शिकंदर शेख आणि जमीर मुल्ला उपस्थित होते.

जगदाळे म्हणाले की, गावातील पाणीटंचाई दूर व्हावी आणि प्रत्येक घरापर्यंत पुरेसे पाणी पोहोचावे, या उद्देशाने ही योजना हाती घेण्यात आली होती. पण योजना राबवूनही नागरिकांच्या पाण्याच्या समस्येत अपेक्षित सुधारणा झालेली नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे योजनेचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना कधी मिळणार, असा प्रश्न उभा राहिला आहे. कोट्यवधी रुपयांची योजना पूर्ण झाल्यानंतरही पाण्यासाठी झगडावे लागणे हे दुर्दैवी आहे, असेही त्यांनी सांगितले.

मसूरची १४ कोटींची जलजीवन योजना अनिश्चिततेत अडकली होती आणि विविध वादांमुळे चर्चेत राहिली होती. ती पूर्ण झाली, वीजजोडणीचा अडसर दूर झाला, पाणी पूजनही झाले. पण घरात पाणी पोहोचण्याच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा अडथळा आला, तोही नळ कनेक्शनचा. नळजोडणी नसल्याने पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. ही नळजोडणी कुणाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आणि मनमानीमुळे रखडली आहे, असा सवाल जगदाळे यांनी केला. योजना गावाला झाली, पण फक्त नावालाच; मसूरकरांच्या नशिबी अशी चेष्टा आली, असे ते म्हणाले.

योजना सुरू करण्यात राजकीय दबाव आहे का, असेल तर तो झारीतील शुक्राचार्य कोण, असे प्रश्न जगदाळे यांनी विचारले. जलजीवन योजना सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाली, तरीही ग्रामस्थांना पाणी नाही. हा प्रश्न राजकीय श्रेयवादाचा राहिलेला नाही; तो ग्रामस्थांच्या पाण्याच्या गरजेचा आणि आरोग्य व अस्तित्वाशी जोडलेला आहे. श्रेय कोणीही घ्या, पण पाणी द्या, असे ते म्हणाले. या ज्वलंत प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र विशेष ग्रामसभा घ्यावी, ही मागणी धुडकावली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

कित्येक वर्षांपासून कालबाह्य झालेल्या जुन्या पाणी योजनेच्या तुटपुंज्या पाण्यावर मसूरकरांना दिवस काढावे लागत आहेत. चोवीस तास स्वच्छ पाण्याची स्वप्ने दाखवण्यात आली, योजना पूर्ण झाली, पण घरात पाणी नाही. १४ कोटींची योजना फक्त कागदावर काळे करण्यासाठी होती की जनतेच्या तृप्तीसाठी, याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागेल, असे मानसिंगराव जगदाळे यांनी स्पष्ट केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ