कन्नडमध्ये शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; गोधडी आणि काठीमुळे ६५ वर्षीय गणपत जाधव बचावले
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कन्नड तालुक्यातील भांबरवाडीच्या उपळा शिवारात मध्यरात्री बिबट्याने झोपलेल्या गणपत जाधव यांच्यावर झडप घातली. अंगावरच्या गोधडीमुळे गळा वाचला आणि तोंडात काठी घालताच बिबट्या पळाला.
कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील उपळा शिवारात बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एक थरारक प्रसंग घडला. शेतातील झोपडीत एकटे झोपलेल्या गणपत जाधव या ६५ वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. जाधव यांनी हिंमत सोडली नाही आणि बिबट्याला पळवून लावले. या प्रसंगात त्यांच्या अंगावरच्या गोधडीनेही जीव वाचवण्यात मोठी भूमिका बजावली.
गणपत जाधव यांचे शेत कन्नड-चाळीसगाव महामार्गालगत आहे आणि तिथेच त्यांची झोपडी आहे. घरचे इतर सदस्य ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेल्यामुळे जाधव एकटेच होते. बुधवारी रात्री जेवण झाल्यावर ते घरासमोरच्या बाजेवर झोपले. थंडी होती, म्हणून त्यांनी अंगभर गोधडी घेतली होती. मात्र त्यांचा उजवा हात गोधडीच्या बाहेर राहिला होता.
मध्यरात्री दोनच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. गोधडीबाहेर असलेल्या उजव्या हाताच्या मनगटाला बिबट्याने जोरात चावा घेतला. हल्ला होताच जाधव यांना जाग आली.
मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी सांगितले की, जाधव यांनी अंगभर गोधडी गुंडाळली होती, म्हणून बिबट्याला त्यांचा अतिशय संवेदनशील असा गळा पकडता आला नाही. त्यामुळे ही गोधडी जाधव यांच्यासाठी खऱ्या अर्थाने सुरक्षा कवच ठरली.
हल्ला झाल्यानंतरही जाधव यांनी हार मानली नाही. प्रसंगावधान राखून त्यांनी जवळ असलेली काठी थेट बिबट्याच्या तोंडात घातली आणि जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला. जाधव यांचा तो आवेश आणि तोंडात घुसलेली काठी पाहून बिबट्या घाबरला आणि तिथून पळून गेला. त्यांच्या ओरडण्याने गावकरी जागे झाले आणि त्यांनी जाधव यांना तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
या हल्ल्यात जाधव यांच्या उजव्या मनगटात बिबट्याचे दोन दात घुसल्याने गंभीर दुखापत झाली आहे. खांद्याखालच्या दंडावरही बिबट्याच्या तीक्ष्ण पंजामुळे गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना अँटी-रेबीज आणि अँटिबायोटिक इंजेक्शन्स देण्यात आली आहेत. पुढील महिनाभर त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवले जाणार असल्याची माहिती कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध गायकवाड यांनी दिली.
या घटनेनंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी वन विभागाच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद सदस्य डॉ. तृप्ती राजपूत, डॉ. दिलीपसिंग राजपूत, डॉ. संजय गव्हाणे आणि राहुल राठोड यांनी वन विभागाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेबद्दल विचारले असता सहायक वनसंरक्षक विशाल कवडे यांनी आपल्याला याची माहिती नसल्याचे सांगितले आणि आपण वैजापूर येथे असल्याचे स्पष्ट केले. वनपाल प्रवीण पारधी यांनी सांगितले की, ते छत्रपती संभाजीनगर येथे होते. घटनेचा पंचनामा करण्यासाठी ते लवकरच घटनास्थळी जाणार आहेत, तसेच तिथे वनरक्षक यशदा साळवे उपस्थित असल्याचेही त्यांनी सांगितले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.