बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 144 | Moderate 04:49 IST

शेतकरी चंद्रकांत शिंदेंच्या मृत्यूचा तपास आता SIT कडे; चार आरोपी अटकेत, पत्नीच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा

नांदेडमध्ये फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह सापडला. पोलीस अधीक्षकांनी SIT स्थापन केली असून चार आरोपी पोलीस कोठडीत आहेत.

शेतकरी चंद्रकांत शिंदेंच्या मृत्यूचा तपास आता SIT कडे; चार आरोपी अटकेत, पत्नीच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नांदेडमधील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंगोली गेट ब्रिजजवळ 'KF Enterprises' या फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. तिथे शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे यांचा मृतदेह सापडला. शिंदे हे ४० वर्षांचे होते आणि मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे राहत होते. या गंभीर घटनेनंतर नांदेड पोलिसांनी वेगाने कारवाई केली आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन (IPS) यांनी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन केले आहे.

मृत शेतकऱ्याची पत्नी ज्योती चंद्रकांत शिंदे (वय ३७) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी माळकौठा गावातील मारोती मंदिराजवळून दोन अनोळखी व्यक्तींनी चंद्रकांत शिंदे यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि नांदेडमधील KF Enterprises च्या कार्यालयात आणले. तिथे त्यांना दोन दिवस डांबून ठेवण्यात आले आणि बेदम मारहाण करण्यात आली.

या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५३३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. यात BNS कलम १०३(१) म्हणजे हत्या, कलम १४०(१) आणि १४०(२) म्हणजे अपहरण, तसेच कलम १४२, १२७(२) आणि ३(५) लावण्यात आली आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा आणि वजिराबाद पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले. जयकुमार उर्फ भैय्या भगवान गायकवाड (२२, गोपाळ चावडी, सिडको), शेख आमेर शेख साहेबहुसेन (२५, खुदबे नगर, देगलूर नाका) आणि इम्रान खान शाहेबाज खान (४०, गोवर्धन घाट) यांना २५ ऑक्टोबर २०२६ रोजी अटक झाली. शेख मुदशीर शेख खदीर (२४, अर्धापूर, ह.मु. पिरबुऱ्हाण नगर) याला २६ ऑक्टोबर २०२६ रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. हे सर्व आरोपी २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत (PCR) आहेत.

या गुन्ह्याचा पुढील तपास नांदेड शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव वेळोवेळी या SIT च्या कामाचा आढावा घेतील आणि मार्गदर्शन करतील. या पथकात तीन पोलीस अधिकारी आणि सहा अंमलदार आहेत.

दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना आवाहन केले आहे. कर्जवसुलीच्या नावाखाली किंवा फायनान्स कंपनीकडून कोणताही बेकायदेशीर त्रास, धमकी किंवा दबाव येत असेल, तर घाबरून टोकाचे पाऊल उचलू नका. तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर कळवा. तक्रार मिळताच कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ