स्त्रीशक्ती फक्त नऊ दिवसांची नाही, रोजचीच आहे: अभिनेत्री जुई गोगरीचा नवरात्रीनिमित्त संदेश
'सनई चौघडे' मालिकेतील असावरी साकारणाऱ्या जुई गोगरीने स्वतःवर विश्वास ठेवणं हीच खरी स्त्रीशक्ती असल्याचं सांगितलं.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नवरात्र म्हणजे भक्ती, उत्साह आणि चैतन्याने भरलेले नऊ दिवस. या काळात देवीच्या वेगवेगळ्या रूपांची आराधना करून स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. पण हा उत्सव फक्त नऊ दिवसांपुरता नसून प्रत्येक दिवस स्त्रियांचाच आहे, असा महत्त्वाचा संदेश अभिनेत्री जुई गोगरी हिने दिला आहे.
'सनई चौघडे' या मालिकेत परब कुटुंबातील साध्या, प्रेमळ आणि लाडक्या असावरीची भूमिका जुई साकारते. स्त्रीशक्ती, आत्मविश्वास आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी लढण्याचं महत्त्व याविषयी तिने आपले विचार मांडले. नवरात्रीत सुट्टी मिळाली की गरबा खेळायला आवर्जून जात असल्याचंही तिने सांगितलं.
स्त्रीशक्तीची व्याख्या काय, असं विचारलं तर जुई म्हणते की आयुष्यातल्या अडचणींना सामोरं जायचं असेल, तर स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. स्त्री एकाच वेळी अनेक भूमिका निभावत असते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच ती करिअरमध्येही पुढे जाण्याचा प्रयत्न करते. वैयक्तिक आयुष्य आणि करिअर यांचा समतोल राखत स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी झटत राहणं, हीदेखील स्त्रीशक्तीच आहे, असं तिने सांगितलं.
स्त्रियांनी स्वतःला कधीही कमी लेखू नये, असंही ती आवर्जून सांगते. स्वप्नं कितीही मोठी असली किंवा आयुष्यात कितीही संकटं आली, तरी मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांचा सामना करता येतो. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असं जुईने म्हटलं.
आपल्यातली स्त्रीशक्ती कधी जाणवली, याबद्दल बोलताना जुईने कॉलेजमधला एक प्रसंग सांगितला. तेव्हा तिच्या कुटुंबाचं नवीन घर घेण्याचं काम सुरू होतं. जुनं घर विकण्यापासून ते नवीन घर घेण्यापर्यंतच्या अनेक जबाबदाऱ्या तिने आणि तिच्या बहिणीने मिळून पार पाडल्या.
त्या अनुभवामुळे कमी वयातही आपण अनेक महत्त्वाच्या गोष्टी करू शकतो आणि आपल्यात ती क्षमता आहे, हे तिला कळलं. तिच्या मते, एखादी गोष्ट करायची ठरवलं, तर स्त्री ती नक्कीच करू शकते. कितीही अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग काढता येईल हा विश्वास प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवा.
नवरात्रीच्या सणाबद्दल बोलताना तिने घरातली परंपराही सांगितली. ती म्हणाली, "मी खरं तर जैन आहे. त्यामुळे गुजराती लोकांप्रमाणे आमच्याकडे नवरात्रीचं फार मोठं सेलिब्रेशन होत नाही. पण आमची जी कुलदेवी आहे, तिची आम्ही नऊ दिवस घरी आरती करतो. आता शूटिंगमुळे त्यासाठी फार वेळ मिळत नाही. पण जेव्हा सुट्टी असते, तेव्हा मी गरबा खेळायला नक्की जाते."
गरबा खेळताना खूप छान वाटतं, असंही जुईने सांगितलं. तिच्यासाठी गरबा हा फक्त आनंदाचा भाग नसून देवीच्या आराधनेशी जोडलेला अनुभव आहे. गरब्यामुळे वातावरणात एक प्रकारची शुद्धता आणि दैवी भावना जाणवते, असं ती म्हणाली.
शेवटी प्रत्येक स्त्रीला संदेश देताना जुई म्हणाली, "मी नेहमी हेच सांगेन की नवरात्रीचे हे फक्त नऊ दिवस स्त्रियांचे नसतात, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचा असतो. त्यामुळे छान जगा, तुम्हाला जे करायचं आहे ते करा आणि ते ठामपणे करा. 'मला हे करायचंच आहे,' असा विश्वास स्वतःवर ठेवा आणि त्याप्रमाणे जगा."
स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये एक वेगळी ताकद असते. नवरात्रीच्या या मंगलमय काळात जुईने दिलेला हा आत्मविश्वासाचा संदेश अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.