इथिओपियातील संघर्षामुळे ५० हजार नागरिकांचा केनियात आसरा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ओरोमिया आणि सोमाली प्रादेशिक भागांमधील हिंसाचारामुळे हजारो नागरिकांना घरे सोडावी लागली असून सुमारे ५० हजार जणांनी शेजारच्या केनियात आश्रय घेतला आहे.
आफ्रिका खंडातील इथिओपिया देशात प्रादेशिक वादातून हिंसाचाराचा भडका उडाला आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. दक्षिण इथिओपियातील ओरोमिया आणि सोमाली या प्रादेशिक भागांमधील संघर्षामुळे आतापर्यंत सुमारे ५० हजार नागरिकांनी शेजारच्या केनियात आश्रय घेतला आहे.
सीमावर्ती भागात गोळीबाराच्या घटना सुरूच असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या विस्थापनामुळे केनियातील सीमावर्ती भागावरही मोठा ताण आला आहे.
सध्या युरोपमध्ये सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे, तर मध्य पूर्वेत इराण, इस्रायल, सौदी आणि हुथी यांच्यातला संघर्ष सुरू आहे. अशातच आफ्रिकेतूनही संघर्ष सुरू झाल्याच्या घटना घडत आहेत. अशा संघर्षांमध्ये निष्पाप लोकांना प्रसंगी आपला जीवही गमवावा लागत आहे.
या वादाची सुरुवात कशी झाली, ते पाहिले तर इथिओपियातील मोयाले शहराच्या परिसरात ओरोमिया आणि सोमाली प्रादेशिक प्रशासनांमध्ये सीमावाद आणि प्रशासकीय नियंत्रणावरून खूप काळापासून तणाव आहे. १८ ऑक्टोबर रोजी सोमाली प्रादेशिक प्रशासनाचा ध्वज फडकवणे आणि नवीन प्रशासकीय कार्यालय सुरू करणे, यावरून वाद पेटला. त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडत गेली.
२२ ऑक्टोबरपासून या संघर्षाने तीव्र स्वरूप घेतले. प्रादेशिक सुरक्षा दल आणि सशस्त्र नागरिक यांच्यात चकमकी झाल्या आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये असुरक्षितता वाढली.
हिंसाचारातून जीव वाचवण्यासाठी केनियात पोहोचलेल्या नागरिकांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या मोठी आहे. अनेक विस्थापित नातेवाइकांकडे राहत आहेत, तर काहींनी शाळा, चर्च आणि तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये आसरा घेतला आहे. अचानक घर सोडावे लागल्याने त्यांच्याकडे अन्नधान्य, कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंची कमतरता निर्माण झाली आहे. लहान मुलांच्या आरोग्याचा आणि पोषणाचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
केनियातील मोयाले परिसरात विस्थापितांसाठी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. अन्नधान्य, स्वच्छ पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आणि तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, येणाऱ्या लोकांची संख्या वाढत असल्याने स्थानिक प्रशासन आणि मदत संस्था यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सीमावर्ती भागातील गोळीबार आणि अस्थिर परिस्थितीमुळे मदतकार्यालाही मर्यादा येत आहेत. हा संघर्ष लवकर थांबला नाही, तर पूर्व आफ्रिकेतील मानवतावादी संकट अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.