स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेंची धडक, ४० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मध्य स्पेनमधील टोलेडो प्रांतात उर्दा शहराजवळ बुधवारी सकाळी एकाच मार्गावरील दोन हायस्पीड रेल्वे एकमेकांवर आदळल्या. ४० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून अनेक जण जखमी आहेत.
मध्य स्पेनमधील टोलेडो प्रांतात उर्दा शहराजवळ बुधवारी (२८ ऑक्टोबर) सकाळी दोन हायस्पीड रेल्वेंची भीषण धडक झाली. या दुर्घटनेत ४० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. स्पेनमधून आलेल्या या मोठ्या आणि धक्कादायक रेल्वे अपघाताच्या बातमीने सगळ्यांचे लक्ष वेधले असून मृतांबद्दल जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ८.५४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. एकाच मार्गावर असलेल्या दोन रेल्वेंपैकी रेन्फे (Renfe) कंपनीची एव्हीइ (AVE) हायस्पीड रेल्वे आयर्यो (Iryo) कंपनीच्या रेल्वेला मागून धडकली. आयर्यो रेल्वेमध्ये १४७ प्रवासी होते, तर रेन्फे रेल्वेमध्ये ३९७ प्रवासी प्रवास करत होते. धडक इतकी जोरदार होती की काही डबे रुळावरून घसरले आणि जवळच्या उतारावर कोसळले. अपघाताच्या वेळी रेल्वेची हालचाल थांबलेली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डबे रुळावरून घसरून उतारावर कोसळल्यामुळे बचावकार्य अधिक कठीण झाले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, नागरी संरक्षण पथके आणि वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जखमींना बाहेर काढण्यासाठी विशेष बचाव पथकांची मदत घेतली जात आहे. गंभीर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी वैद्यकीय हेलिकॉप्टर आणि फिरती अतिदक्षता उपचार यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे. जवळच्या रुग्णालयांना सतर्क करण्यात आले असून आपत्कालीन उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक प्रवाशांना डब्यांमधून बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांना मोठे प्रयत्न करावे लागत आहेत.
या दुर्घटनेनंतर माद्रिद आणि दक्षिणेकडील अंडालुसिया प्रांतादरम्यानची हायस्पीड रेल्वे वाहतूक दोन्ही दिशांनी थांबवण्यात आली आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना प्रवासात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून ते बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, रेल्वेची सुरक्षा यंत्रणा आणि सिग्नल व्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून या अपघाताचा सखोल तपास सुरू आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.