बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 211 | Poor 02:42 IST

इथिओपियात चर्च आणि गावांवर सशस्त्र हल्ले; दोन घटनांत किमान ६० जणांचा मृत्यू

ओरोमिया प्रांतात चर्च आणि गावांना लक्ष्य करून झालेल्या दोन हल्ल्यांत किमान ६० जणांचा मृत्यू झाला आहे. इथिओपियन ऑर्थोडॉक्स तेवाहेडो चर्चने ही माहिती दिली.

इथिओपियात चर्च आणि गावांवर सशस्त्र हल्ले; दोन घटनांत किमान ६० जणांचा मृत्यू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

आफ्रिका खंडातील इथिओपिया देशात धार्मिक आणि राजकीय संघर्षाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले आहे. देशातील ओरोमिया प्रांतात चर्च आणि गावांना लक्ष्य करून सशस्त्र हल्ले करण्यात आले असून, ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये किमान ६० जणांचा मृत्यू झाला आहे.

ही माहिती इथिओपियन ऑर्थोडॉक्स तेवाहेडो चर्चने दिली आहे. मृतांमध्ये ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन समुदायातील नागरिकांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, धार्मिक तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक घरे जाळण्यात आली असून २० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

चर्चने दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजी मेर्ती जिल्ह्यातील हल्ल्यात १४ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी शेरका जिल्ह्यातील टेरेटा, चोले आणि बिरबो परिसरात दुसरा भीषण हल्ला झाला. या हल्ल्यात तब्बल ४६ जणांना जीव गमवावा लागला. अशा प्रकारे दोन्ही घटनांमध्ये मृतांचा एकूण आकडा ६० वर पोहोचला आहे.

हल्ल्यांमध्ये २० हून अधिक घरे जाळण्यात आली असून २० पेक्षा अधिक नागरिकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सशस्त्र हल्लेखोरांनी गावांमध्ये घुसून नागरिकांना लक्ष्य केले. दोन चर्चवरही हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अनेक घरांची जाळपोळ करण्यात आल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या हिंसाचारामुळे परिसरातील कुटुंबांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिक सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. धार्मिक समुदायाला लक्ष्य करून हल्ले होत असल्याची चिंता चर्चच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या हल्ल्यांमागे नेमके कोण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. ओरोमिया प्रादेशिक सरकारने या हल्ल्यांसाठी बंडखोर गटांशी संबंधित आघाडीला जबाबदार धरले आहे. दुसरीकडे, बंडखोर आघाडीशी संबंधित सूत्रांनी सरकारवरच गंभीर आरोप केले आहेत. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, इथिओपियन मानवाधिकार आयोगाने या घटनेची दखल घेतली असून परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. चर्चने सरकारकडे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

#नागपूर#WorldWatch#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ