रणजीव पुरी मिशिगन प्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष, या पदावर पोहोचलेले पहिले भारतीय-अमेरिकन
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भारतीय-अमेरिकन नेते रणजीव पुरी यांची मिशिगन राज्याच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पंजाबी शीख कुटुंबात जन्मलेल्या पुरी यांच्या निवडीचे दक्षिण आशियाई समुदायात कौतुक होत आहे.
अमेरिकेच्या राजकारणात भारतीय वंशाच्या लोकांचा प्रभाव आणि स्थान दिवसेंदिवस अधिक मजबूत होताना दिसत आहे. त्यात आता आणखी एक भर पडली आहे. भारतीय-अमेरिकन नेते रणजीव पुरी यांची मिशिगन राज्याच्या प्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष (Speaker of the House) म्हणून निवड झाली आहे. या पदावर पोहोचणारे ते पहिलेच भारतीय-अमेरिकन आहेत. मिशिगनसारख्या महत्त्वाच्या राज्यातील सत्ताकारणात एका भारतीय वंशाच्या नेत्याने मिळवलेला हा विजय अमेरिकेतील भारतीय समुदायासाठीच नव्हे, तर सगळ्या दक्षिण आशियाई लोकांसाठी अभिमानाची गोष्ट मानली जात आहे.
पुरी यांचे वय ४२ वर्षे आहे. त्यांचा जन्म अमेरिकेतच एका पंजाबी शीख कुटुंबात झाला. चांगले भविष्य आणि संधी मिळावी म्हणून त्यांचे आई-वडील भारतातून अमेरिकेत आले होते. पंजाबमधून आलेल्या कुटुंबातील मुलाने कष्ट, शिक्षण आणि राजकीय निष्ठेच्या जोरावर मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणा देणारे ठरेल, असे या निवडीकडे पाहिले जात आहे. आता प्रतिनिधीगृहाच्या सर्वोच्च खुर्चीत बसून ते संपूर्ण सभागृहाचे कामकाज पाहणार आहेत. या निवडीनंतर त्यांचे जगभरातून कौतुक होत आहे.
आनंद व्यक्त करताना पुरी यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली. त्यात ते म्हणाले, "माझे आई-वडील जेव्हा पंजाब सोडून अमेरिकेत आले होते, तेव्हा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की त्यांचा मुलगा एका दिवशी मिशिगन प्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व करेल." सहकाऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभारही मानले आहेत.
निवडणुकीच्या काळात मिशिगनमधील जनतेला दिलेली सगळी आश्वासने पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे पुरी यांनी स्पष्ट केले. राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी सिनेटचे बहुमत नेते डॅरिन कॅमिलरी आणि नवनिर्वाचित गव्हर्नर जॉसेलिन बेन्सन यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करायला आपण उत्सुक आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुरी यांची राजकीय वाटचाल टप्प्याटप्प्याने झाली आहे. २०२० मध्ये ते मिशिगन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जची निवडणूक जिंकले आणि मिशिगन विधानमंडळाच्या इतिहासात निवडून आलेले पहिले शीख-अमेरिकन प्रतिनिधी ठरले. त्यानंतर त्यांनी मतदारसंघातील लोकांचे प्रश्न तडफेने मांडले आणि त्यांची लोकप्रियता वाढत गेली. २०२५ मध्ये त्यांची हाऊसमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते (Democratic Leader) म्हणून नियुक्ती झाली. सध्या ते तिसऱ्यांदा मिशिगन प्रतिनिधीगृहात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत.
राजकारणाची आवड त्यांना सुरुवातीपासून होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या २००८ आणि २०१२ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेस (Booth School of Business) मधून त्यांनी एमबीए (MBA) पदवी मिळवली. त्यानंतर मिशिगनला परतून त्यांनी वाहन उद्योगात (Auto Industry) वित्तीय आणि व्यावसायिक सल्लागार म्हणून काही वर्षे काम केले.
अमेरिकेतील राजकारणात उपराष्ट्राध्यक्षपद असो, विविध राज्यांचे गव्हर्नरपद असो वा प्रांतिक संसदेतील प्रतिनिधित्व असो, भारतीय वंशाचे नेतृत्व प्रत्येक ठिकाणी आपली छाप पाडत आहे. भारतीय समुदायातील स्थानिक नेत्यांनी आणि विविध संघटनांनी पुरी यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.