शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:52 IST

कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान, १७४ जणांचे प्राण वाचवले

कॉकपिटमध्ये कुऱ्हाडीच्या हल्ल्यात जखमी होऊनही फ्लायदुबईच्या विमानातील १७४ जणांना सुखरूप ठेवणाऱ्या भारतीय वैमानिकाला इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी पुरस्कार जाहीर केला आहे.

कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान, १७४ जणांचे प्राण वाचवले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

फ्लायदुबईच्या विमानात हजारो फूट उंचीवर घडलेल्या थरारात १७४ जणांचे प्राण वाचवणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर (Smit Machchhar) यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळणार आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी त्यांना 'प्रेसिडेंशियल अवॉर्ड फॉर सिव्हिलियन हिरोइझम' म्हणजेच नागरी शौर्यासाठी राष्ट्रपती पुरस्कार देण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

हा प्रकार हवेत उडत असलेल्या फ्लायदुबईच्या विमानातच घडला. विमानाचा सह-वैमानिक हमाम अल-हम्मामी याने कॉकपिटमध्येच विमान हायजॅक करून ते पाडण्याचा कट रचला होता. त्याने अचानक मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. विमान नष्ट करण्याचा त्याचा डाव होता.

या हल्ल्यात कॅप्टन मच्छर गंभीर जखमी झाले आणि त्यांना खूप रक्तस्त्राव सुरू झाला. इतक्या कठीण आणि जीवघेण्या प्रसंगातही त्यांनी हिंमत सोडली नाही. स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करून त्यांनी कॉकपिटचा सुरक्षा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच विमानातले इतर प्रवासी आणि ड्युटीवर नसलेले कर्मचारी लगेच कॉकपिटमध्ये गेले आणि त्यांनी हल्लेखोर सह-वैमानिकाला पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या.

कॉकपिटमधल्या या झटापटीमुळे विमानाचे नियंत्रण काही काळ सुटले होते. अवघ्या दोन मिनिटांत विमान १६,००० फूट खाली आले. हायजॅकिंग आणि अपघाताचा इशारा मिळताच क्रू मेंबर्सनी मोठ्या कौशल्याने विमानाची दिशा बदलली आणि सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर तातडीने आपत्कालीन लँडिंग केले. कॅप्टन मच्छर यांच्या तत्परतेमुळे विमानातले सर्व १७४ प्रवासी आणि क्रू मेंबर्स पूर्णपणे सुखरूप राहिले.

राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी या घटनेतल्या वीरांचा गौरव करताना कॅप्टन मच्छर यांच्या कामगिरीचा खास उल्लेख केला. ते म्हणाले, "कॅप्टन स्मित मच्छर यांनी जखमी अवस्थेतही जे अद्भूत शौर्य दाखवले ते कौतुकास्पद आहे. त्यांनी दाखवलेली निष्ठा आणि कर्तव्याची जाणीव अतुलनीय आहे. त्यांनी केवळ १७४ लोकांचे प्राण वाचवले नाहीत, तर एक मोठा दहशतवादी हल्ला अयशस्वी केला."

कॅप्टन मच्छर सध्या संयुक्त अरब अमिराती (UAE) मधल्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना इस्रायलचा हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, असे हर्झोग यांनी स्पष्ट केले आहे.

कौतुक फक्त इस्रायलपुरते मर्यादित नाही. अमेरिकेतही या भारतीय कॅप्टनच्या धाडसाची दखल घेतली गेली आहे. न्यू जर्सीचे काँग्रेस सदस्य जोश गॉटहाइमर यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये स्मित मच्छर यांच्या सन्मानाचा ठराव मांडला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांनीही कॅप्टन मच्छर यांच्या धाडसाचे कौतुक करत त्यांना 'खरा नायक' म्हटले आहे. आज जगभरातून या भारतीय वैमानिकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ