इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाही, अथेन्समध्ये परराष्ट्र सचिव रुबियो यांचा इशारा
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी अथेन्समध्ये सांगितले की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली इराणला अण्वस्त्रे बनवू दिली जाणार नाहीत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी इराणबाबत अमेरिकेची भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिका इराणला कधीही अणुबॉम्ब किंवा अण्वस्त्रे बनवू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. मध्यपूर्वेत राजकीय आणि लष्करी तणाव वाढलेला असताना त्यांचे हे विधान आले आहे.
रुबियो यांनी अथेन्समध्ये ग्रीसचे परराष्ट्र मंत्री जॉर्ज गेरापेट्रिस यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हे सांगितले. ही अमेरिकेची अंतिम आणि अलिखित 'लक्ष्मणरेषा' आहे आणि त्यावर कोणतीही तडजोड होणार नाही, असे त्यांनी म्हटले.
गेल्या काही वर्षांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील अण्वस्त्रांविषयीची बोलणी नाजूक टप्प्यावर पोहोचली आहेत. भविष्यात एखादा करार झाला तर त्यात इराणला ठरावीक मर्यादेपर्यंत युरेनियम संवर्धन (Uranium Enrichment) करू दिले जाईल का, असा थेट प्रश्न रुबियो यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितले की कराराचे निकष काहीही असले तरी त्याचा अंतिम उद्देश एकच असेल, तो म्हणजे इराण अण्वस्त्रधारी देश होऊ शकणार नाही. उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी याआधी इराणने आपली युरेनियम संवर्धन क्षमता तातडीने कमी करावी, अशी मागणी केली होती. रुबियो यांच्या बोलण्यातून तिचाच पुनरुच्चार दिसला.
अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी दावा केला की, तेहरान आपली लष्करी ताकद अशा टप्प्यावर नेण्याचा प्रयत्न करत होता की, कोणत्याही देशाने इराणच्या अणुसुविधांवर (Nuclear Facilities) हल्ला करण्याचा विचार केला तरी त्याला मोठ्या प्रतिहल्ल्याची भीती वाटावी. त्यासाठी इराणने अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि प्रक्षेपकांचा (Launchers) प्रचंड साठा उभा केला होता. या पारंपरिक ताकदीच्या जोरावर अणुकार्यक्रमाभोवती सुरक्षेचे कवच तयार करणे ही इराणची मुख्य योजना होती, असा आरोप वॉशिंग्टनने केला आहे.
ही योजना वेळेतच हाणून पाडल्याचा दावा रुबियो यांनी केला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या थेट आदेशानंतर अमेरिकन लष्करी कारवाईत इराणची ड्रोन बनवण्याची क्षमता आणि ड्रोनचे जाळे मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले, असे ते म्हणाले. इराणचे क्षेपणास्त्र प्रक्षेपक कमकुवत झाले असून नौदल आणि हवाई दलही लक्षणीयरीत्या कमजोर झाले आहे, असेही रुबियो यांनी सांगितले. लष्करी नुकसानीच्या या दाव्यांची स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्थांकडून अधिकृत पडताळणी झालेली नाही, तरीही या विधानांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.
बुधवारी सीबीएस न्यूजच्या ऑलिव्हिया गॅझिस यांच्याशी बोलताना रुबियो यांनी युरेनियम संवर्धन शून्यापेक्षा जास्त चालेल का, हे सांगण्यास नकार दिला. काय चालेल आणि काय नाही, याच्या तपशिलात आपण जाणार नाही, असे ते म्हणाले. मात्र इराणकडे 'कधीही अण्वस्त्र असणार नाही', हे त्यांनी पुन्हा सांगितले. व्हान्स यांनी इराणने संवर्धन क्षमतेत 'अर्थपूर्ण' कपात करावी, असे म्हटले होते.
रुबियो यांनी इराणच्या आर्थिक स्थितीवरही बोट ठेवले. इराणमध्ये सध्या असलेल्या तीव्र आर्थिक संकटाला तेथील राजकीय नेतृत्वच पूर्णपणे जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. अमेरिकेसह जागतिक समुदायाने लादलेल्या कठोर आर्थिक आणि व्यापारी निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. नागरिक महागाई आणि रोजगाराच्या प्रश्नाने त्रस्त आहेत, तर सरकारचा महसूल वेगाने घटत आहे.
रुबियो यांच्या मते, इराणची लष्करी स्थिती इतकी कमकुवत झाली आहे की, तेहरान आता पारंपरिक लष्करी सामर्थ्याच्या जोरावर अणुकार्यक्रमाविरुद्धच्या जागतिक कारवाईला रोखू शकत नाही. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदी आहेत, तोपर्यंत इराणला अण्वस्त्र मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करू दिले जाणार नाही, असे त्यांनी पुन्हा सांगितले. अमेरिकेच्या या कठोर पवित्र्यामुळे मध्यपूर्वेतील भू-राजकीय समीकरणे अधिक तीव्र आणि गुंतागुंतीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.