गरबा खेळताना मेकअप टिकवायचा आहे? या सोप्या ब्युटी टिप्स लक्षात ठेवा
नवरात्रीत गरबा खेळताना घामामुळे मेकअप लवकर निघतो. तो जास्त वेळ टिकवण्यासाठी स्किन केअरपासून सेटिंग स्प्रेपर्यंतच्या टिप्स.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शारदीय नवरात्री उत्सवाला आता काहीच दिवस उरले आहेत. यंदा नवरात्री ११ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत साजरी होणार आहे. सणाच्या दिवसांत सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीच्या वेगवेगळ्या शक्तिस्वरूपांची पूजा करून आशीर्वाद मिळवण्यासाठी संपूर्ण राज्यभर हा सण साजरा होतो.
दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यासोबतच अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियाचेही आयोजन केले जाते. सगळ्या मुली छान नटूनथटून गरबा खेळायला जातात. मेकअप, मॅचिंग दागिने आणि लेहेंगा घालून त्या मैदानात उतरतात. पण गरबा खेळताना सतत घाम येतो आणि त्यामुळे काही तासांतच मेकअप निघायला लागतो.
मेकअप घामाने निघून गेला की पुन्हा एकदा मेकअप करावा लागतो. असा वारंवार मेकअप केल्याने किंवा चुकीची प्रॉडक्ट वापरल्याने चेहरा काळा पडतो. मेकअप तर खराब होतोच, पण त्वचेचेही नुकसान होते. म्हणूनच मेकअप करताना कोणत्या टिप्स पाळाव्यात, याची सविस्तर माहिती इथे दिली आहे. त्यामुळे तुमचा मेकअप जास्त वेळ व्यवस्थित टिकेल. चुकीचे स्किन केअर वापरले, किंवा तुमच्या त्वचेला मॅच न होणारे प्रॉडक्ट वापरले, तर मेकअप काळा पडतो आणि चेहऱ्यावरची चमक राहत नाही.
मेकअप जास्त वेळ टिकवण्यासाठी आणि चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी योग्य स्किन रूटीन पाळावे. मेकअप करण्याआधी सौम्य फेसवॉशने चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्वचेच्या प्रकारानुसार हलके मॉइश्चरायझर लावा. त्वचा खूप कोरडी असेल तर क्रीम-बेस मॉइश्चरायझर वापरावे, आणि त्वचा तेलकट असेल तर जेल-बेस्ड मॉइश्चरायझर वापरावे. चांगल्या दर्जाचे स्किन केअर आणि मेकअप प्रॉडक्ट वापरले तर त्वचेला कोणतीही हानी पोहोचणार नाही.
स्किन केअर झाल्यावर चेहऱ्यावर चांगल्या दर्जाचे प्राइमर लावावे. प्राइमरमुळे त्वचा गुळगुळीत होते आणि मेकअप त्वचेवर घट्ट बसून टिकायला मदत होते. त्यानंतर फाउंडेशन किंवा सीसी क्रीम लावावी. मेकअपचे जाड थर लावू नका. फाउंडेशन लावल्यावर लगेच दुसरे प्रॉडक्ट न लावता मेकअप नीट सेट होऊ द्या. असे केल्यास चेहऱ्यावर भेगा किंवा मेकअप केकी दिसणार नाही. डोळ्यांचा मेकअप पसरू नये म्हणून वॉटरप्रूफ आयलायनर, मस्करा आणि आयशॅडो वापरावा.
फाउंडेशन सेट करण्यासाठी आणि जास्तीचे तेल शोषून घेण्यासाठी ट्रान्सलुसंट सेटिंग पावडर किंवा कॉम्पॅक्ट वापरले तर मेकअप अजिबात निघणार नाही, आणि घामाच्या धारांमुळेही खराब होणार नाही. मेकअप पूर्ण झाल्यावर चेहऱ्यावर चांगल्या दर्जाचा मेकअप सेटिंग स्प्रे किंवा फिक्सर मारून मेकअप लॉक करून घ्या. शेवटी आवडीनुसार लिपस्टिक लावून मेकअप सेट करा. या स्टेप्स पाळून मेकअप केला तर ऊन किंवा घामातही तो चांगला टिकून राहील.
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिला आहे. यात कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.