गरबा नाईटसाठी कोणता लूक? सोनम, अनन्या आणि आलियाच्या स्टाइलमधून मिळतील कल्पना
नवरात्रौत्सवाला काही दिवस उरले असताना गरबा आणि दांडियासाठी बॉलिवूड अभिनेत्रींच्या लूकमधून प्रेरणा घेता येईल.
नवरात्रौत्सवाला आता अवघे काही दिवस उरले आहेत आणि सगळीकडे तयारीला सुरुवात झाली आहे. नवरात्र म्हटलं की गरबा, रास-दांडिया आणि रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख यांची वेगळीच उत्सुकता असते. देशभरातच नाही, तर जगभरात नवरात्रीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होतात. त्यामुळे नऊ दिवसांत नेमका कोणता लूक करायचा, हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो.
गरबा नाईटमध्ये इतरांपेक्षा वेगळं आणि स्टायलिश दिसायचं असेल, तर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅशनमधून प्रेरणा घेता येईल. सोनम कपूरपासून अनन्या पांडे आणि आलिया भट्टपर्यंत या अभिनेत्रींचे काही लूक्स नवरात्रीसाठी परफेक्ट फॅशन गोल्स देतात.
पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइलचा सुंदर मेळ साधायचा असेल, तर इंडो-फ्युजन लूक उत्तम पर्याय ठरू शकतो. सोनम कपूरने परिधान केलेला पुनीत बलानाचा पोशाख यासाठी चांगली प्रेरणा देतो. कॉलर असलेला कुर्ता आणि इंडो-फ्युजन शरारा सेट असा हा लूक आहे. पारंपरिक पोशाखाला त्यात मॉडर्न टच मिळतो आणि गरबा किंवा दांडियाच्या कार्यक्रमात तो स्टायलिश दिसण्यासोबतच आरामदायकही ठरू शकतो.
नेहमीचा पारंपरिक ब्लाउज न घालता काहीतरी हटके करायचं असेल, तर अनन्या पांडेच्या लूककडे बघता येईल. त्यासाठी खास तयारीची गरज नाही. तुमच्याकडे असलेला आवडता ट्यूब टॉप घ्या आणि आईच्या कपाटातील भरगच्च नक्षीकाम असलेली साडी निवडा. गळ्यात पारंपरिक चोकर घाला आणि केसांत मोगऱ्याचा गजरा माळा. त्यामुळे लूकला आणखी सुंदर पारंपरिक टच मिळेल. साधा असूनही हा लूक सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल.
नवरात्रीच्या गर्दीत वेगळं दिसायचं असेल, तर ब्लाउजच्या बाबतीत प्रयोग करणं गरजेचं आहे. आलिया भट्टने घातलेला नाजूक चायनीज-कट ब्लाउज यासाठी चांगली फॅशन इन्स्पिरेशन ठरू शकतो. साडी हलकी आणि नाजूक असेल, तर आकर्षक ब्लाउजमुळे संपूर्ण लूकला वजनदार आणि प्रभावी टच मिळतो. म्हणजेच साडी साधी ठेवून ब्लाउजच्या डिझाइनवर जास्त भर देता येईल.
थोडा अधिक मॉडर्न आणि एलिगंट लूक हवा असेल, तर शिफॉनची साडी नक्की ट्राय करा. साडी पारंपरिक पद्धतीने नेसा आणि त्यावर त्याच रंगाचा साधा, मिनिमल ब्लाउज घाला. ब्लाउज आकर्षक असेल, तर साधी साडीही उठून दिसते. मिसमॅचिंग ब्लाउजमुळे कॉन्ट्रास्ट तयार होतोच, पण साडी आणि ब्लाउजचा मोनोक्रोमॅटिक लूकही तितकाच क्लासी दिसू शकतो.
नऊवारी साडीच्या चुण्या तशाच ठेवून त्यातून लेहेंगा लूक तयार करण्याची कल्पनाही करून पाहता येईल. यासाठी आलिया भट्टच्या स्टाइलमधून प्रेरणा घेता येईल. या पोशाखासोबत भरजरी दागिने घातले, तर लूक आणखी उठून दिसेल. केस मोकळे ठेवले, तर त्याला थोडा ग्लॅमरस टच मिळेल. गरबा नाईटसाठी पारंपरिक पोशाखाला मॉडर्न ट्विस्ट देण्याचा हा हटके पर्याय ठरू शकतो.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत रोज वेगळा लूक करायचा विचार असेल, तर सेलिब्रिटींच्या या स्टाइलिंग टिप्स नक्कीच उपयोगी पडतील. पारंपरिक पोशाखासोबत थोडे मॉडर्न प्रयोग करून गरबा नाईटमध्ये स्वतःचा वेगळा स्टाइल स्टेटमेंट तयार करता येईल.