गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
11:30  दिवाळीच्या तोंडावर खम्मममध्ये दुर्घटना, बचाव पथकाच्या दोन बोट उलटल्या; 10 जवान बेपत्ता 4 नोव्ह | 17:10  वाठोड्यातील कचरा वर्गीकरण प्रकल्पात ट्रॉमल मशीनमध्ये अडकून २८ वर्षांच्या कामगाराचा मृत्यू 4 नोव्ह | 15:40  नागपूर जिल्ह्यात नवीन बोअरवेल खोदायला बंदी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सुधारित आदेश 10:57  नागपूर जिल्ह्यात चारा व पाणीटंचाईची शक्यता, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे कडक आदेश 10:55  धनत्रयोदशीच्या तोंडावर सोने ४,८०० रुपयांनी महाग, चांदी ९,००० रुपयांनी वाढली 09:54  नागपूर हिवाळी अधिवेशन: 19 नोव्हेंबरपासून विधान भवनात अधिकाऱ्यांचे येणे सुरू, विभागीय आयुक्त बिदरी यांचे
सर्व थेट अपडेट

गडचिरोलीत पत्रकारांसाठी माओवादावर कार्यशाळा; समन्वय आणि संवादावर भर

गडचिरोलीत पत्रकारांसाठी माओवादावर कार्यशाळा; समन्वय आणि संवादावर भर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

गडचिरोली पोलीस दल आणि पत्र सूचना कार्यालय नागपूर यांनी बुधवारी पत्रकारांसाठी 'माओवादमुक्त भारत' या विषयावर कार्यशाळा घेतली. आपसातील समन्वय आणि सकारात्मक संवादातून हे शक्य असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

गडचिरोली पोलीस दल आणि केंद्र सरकारचे पत्र सूचना कार्यालय, नागपूर यांनी मिळून बुधवारी पत्रकारांसाठी एक कार्यशाळा घेतली. 'माओवादमुक्त भारत' हा तिचा विषय होता. माओवाद कसा फोफावला, तो संपवण्यासाठी आजवर कोणते प्रयत्न झाले आणि माओवादमुक्त भारत घडवताना पुढे कोणती आव्हाने आहेत, यावर यात चर्चा झाली. आपसातील समन्वय आणि सकारात्मक संवादातून हे शक्य आहे, असे उपस्थित वक्त्यांनी सांगितले.

हा कार्यक्रम पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात झाला. विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील नागपूरहून आभासी पद्धतीने सहभागी झाले. पोलीस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) योगेश कुमार आणि पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते. माओवाद या विषयाचे अभ्यासक, ज्येष्ठ लेखक आणि पॉलिसी अॅनालिस्ट पी.व्ही. रामना, ज्येष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच पत्र व माहिती कार्यालय नागपूरचे सौरभ खेकडे आणि देवप्रकाश दुबे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख वक्त्यांनी माओवादाची सुरुवात कशी झाली, तो कसा पसरला, आजची स्थिती काय आहे, माओवाद्यांची कार्यपद्धती आणि त्यांची विचारसरणी कशी आहे, हे सांगितले. माओवादविरोधी अभियानात येणाऱ्या अडचणींचीही माहिती दिली. त्यासोबत त्यांनी आपले अनुभव, अभ्यासातून आलेली निरीक्षणे आणि महत्त्वाचे विचार मांडले. पत्रकार कार्तिक लोखंडे यांनी 'माओवादी संपले, पण माओवाद संपला का?' असा सवाल उपस्थित केला. उरलेल्या माओवादातून विकासाच्या कामांत कोणत्या मार्गांनी अडथळे आणले जातील, याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

सशस्त्र माओवादाचा अस्त झाल्यानंतर भविष्यात पोलीस दलासमोर कोणती आव्हाने असतील, यावर संदीप पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. योगेश कुमार आणि एम. रमेश यांनीही गडचिरोली जिल्ह्यातील माओवादविरोधी संघर्षाचा प्रवास मांडला. पोलीस दलाने स्वीकारलेल्या वेगवेगळ्या रणनीती, सुरक्षा यंत्रणांचे योगदान आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग यावर त्यांनी प्रकाश टाकला. विकासाच्या उपक्रमांतून माओवादाचा प्रभाव कमी करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचीही माहिती त्यांनी दिली.

गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात आला आहे. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी पोलीस दल, शासन, माध्यमे आणि समाजातील विविध घटक यांच्यात समन्वय आणि सकारात्मक संवाद हवा, हे कार्यक्रमात अधोरेखित झाले. वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ आणि पत्रकार यांनी माओवादविरोधी अभियानातील अनुभव, यशस्वी कार्यपद्धती आणि पुढील आव्हाने यावर विचारमंथन केले. पत्रकारांनी प्रश्न विचारून चर्चेत सक्रिय भाग घेतला. माओवादाकडे फक्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि विकासाच्या दृष्टिकोनातूनही पाहण्याची गरज आहे, असेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या वार्तालापामुळे पत्रकारांना माओवादाच्या समस्येची वस्तुनिष्ठ माहिती मिळाली. नक्षलमुक्त भारताच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांची पार्श्वभूमी, सध्याची स्थिती आणि पुढची वाटचाल याबद्दल सविस्तर जाणून घेण्याची संधीही मिळाली. माओवादविरोधी अभियानात प्राणांची आहुती दिलेल्या 214 शहीद जवानांच्या स्मृतीला या कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ