शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात 18 तास थांबल्यानंतर चार महिलांची सिझेरियन प्रसूती

आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात 18 तास थांबल्यानंतर चार महिलांची सिझेरियन प्रसूती छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
तब्येत PT24 टीम

डॉक्टर उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रिया अडल्या होत्या. गडचिरोली आणि धानोरा येथून अधिकारी आल्यावर चारही प्रसूती पार पडल्या.

आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या चार गर्भवती महिलांना सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी तब्बल 18 तास थांबावे लागले. रुग्णालयातील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शेवटी गडचिरोली आणि धानोरा येथून डॉक्टरांना बोलावून घेतल्यानंतर या महिलांच्या सिझेरियन प्रसूती झाल्या. बाळ आणि बाळंतीण सध्या सुखरूप आहेत.

या महिलांना शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सिझेरियन शस्त्रक्रिया केली जाईल, असे सांगण्यात आले होते. पण आवश्यक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रिया अडून राहिल्या. त्यामुळे महिलांना आणि त्यांच्या नातेवाइकांना अनेक तास ताटकळत बसावे लागले. शस्त्रक्रियेची वाट पाहणाऱ्या महिलांना रात्रीपासून अन्नपाण्याशिवाय राहावे लागले, अशी माहिती नातेवाइकांनी दिली.

रुग्णांच्या एका नातेवाइकाने हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांना सांगितला. घोडाम यांनी लगेच आरमोरीचे उपजिल्हा रुग्णालय गाठले आणि चौकशी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. बन्सोड यांनी डॉक्टर उपलब्ध नाहीत, ते येत आहेत म्हणून वेळ लागतोय, असे सांगितले. डॉक्टर नसतील तर गर्भवती महिलांना गडचिरोलीला रेफर का केले नाही, असे घोडाम यांनी विचारले. त्यावर डॉ. बन्सोड यांनी त्यांना वरिष्ठांशी बोलण्याचा सल्ला दिला.

रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजकुमार कोरोटी रजेवर होते. तरीही घोडाम यांनी त्यांना फोन करून परिस्थिती सांगितली. कोरोटी यांनी लगेच लक्ष घालून गडचिरोली येथून डॉ. आत्राम आणि धानोरा येथून डॉ. दुधे या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरमोरीला बोलावले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास चारही महिलांच्या सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. सर्व माता आणि नवजात बाळे सुखरूप आहेत. वेळेवर हस्तक्षेप आणि पाठपुरावा केल्यामुळे शस्त्रक्रिया झाल्या, अशी भावना नातेवाइकांनी व्यक्त केली.

या घटनेनंतर काही प्रश्न विचारले जात आहेत. प्रसूतीसारख्या नाजूक बाबतीत आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसणे गंभीर आहे. सकाळी 10 वाजता शस्त्रक्रिया होणार असे सांगितले असताना डॉक्टरांची व्यवस्था वेळेत का झाली नाही, पर्यायी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सोय का केली नव्हती आणि महिलांना 18 तास का थांबावे लागले, असे ते प्रश्न आहेत.

जिल्हा आरोग्य प्रशासनाने या घटनेची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, तसेच आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात 24 तास आवश्यक ते डॉक्टर उपलब्ध राहतील अशी व्यवस्था करावी, अशी मागणी दिलीप घोडाम, वृंदा मडावी आणि रुग्णाचे एक नातेवाईक यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांच्याकडे केली आहे.

#नागपूर#सेहत#PT24#Health#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ