शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

गडचिरोलीत तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस शिपाई आणि महिला पोलीस शिपायाला अटक

गडचिरोलीत तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस शिपाई आणि महिला पोलीस शिपायाला अटक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आणि आईची तक्रार यांच्या आधारे कुरखेडा पोलिसांनी कारवाई केली.

गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरतीची तयारी करताना जुळलेली ओळख प्रेमात बदलली आणि ते प्रेम लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचले. पण दोघांच्या मध्ये तिसरीची एंट्री झाल्याने प्रेम आणि विश्वासाला तडा गेला. हे सहन न झाल्याने एका तरुणीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी कुरखेडा पोलिसांनी प्रियकर असलेल्या पोलीस शिपायासह एका महिला पोलीस शिपायाला अटक केली आहे. तरुणीने आत्महत्या करताना लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि तिच्या आईने केलेली तक्रार, यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

कुरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंजनटोला गावातली ही तरुणी गेल्या वर्षी पोलीस भरतीचे स्वप्न बघत गडचिरोलीत सराव करण्यासाठी आली होती. लांझेडा भागात रूम करून ती राहात होती. इन्स्टाग्रामवर तिची ओळख शिवकुमार छोटेलाल करसायल (28 वर्षे, रा. टेमली, ता. कोरची) याच्याशी झाली. शिवकुमारही पोलीस भरतीची तयारी करत होता, त्यामुळे मैदानावर दोघांमधली जवळीक वाढली आणि दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले.

पुढे पोलीस भरतीत शिवकुमारची निवड झाली, पण तरुणीची निवड होऊ शकली नाही. शिवकुमारची ड्युटी किटाळीच्या कमांडो ट्रेनिंग सेंटरमध्ये लागली. निवड न झाल्याचे दु:ख सोसत तरुणी आपल्या गावी परतली, तरीही शिवकुमारशी असलेले प्रेमसंबंध कायम होते. भविष्यात आपलीही पोलीस भरतीत निवड होईल आणि शिवकुमारशी लग्न होईल, या आशेवर ती होती.

दरम्यान, शिवकुमारची ओळख गडचिरोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई अश्विनी राऊत (26 वर्षे, रा. बोडधा, ता. देसाईगंज) हिच्याशी झाली. या काळात शिवकुमार आपल्या प्रेयसीपासून दूर गेला आणि लग्नालाही तयार नव्हता, त्यामुळे तरुणी नैराश्यात गेली. त्यातच अश्विनीने तिला फोन करून अपमानास्पद भाषेत खरडपट्टी काढली, त्यामुळे ती पूर्णपणे खचली. ज्याच्यावर प्रेम केले त्याने धोका दिला आणि सगळी स्वप्ने भंगली, या नैराश्याने तिला ग्रासले.

अखेर गेल्या 7 सप्टेंबर रोजी तरुणीने आपल्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले. पण आत्महत्येपूर्वी तिने आपली आपबिती चिठ्ठीत लिहून ठेवली होती. तरुणीच्या आईला तिची ही मनस्थिती माहीत होती. आईने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत आत्महत्येमागच्या कारणांचा उल्लेख करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

कुरखेडा पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रमाची सत्यता पडताळून पाहिली. त्यानंतर 52 दिवसांनी पोलीस शिपाई शिवकुमार करसायल आणि महिला पोलीस शिपाई अश्विनी राऊत यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास कुरखेडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव करत आहेत.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ