पुणे स्टेशनवर दिवाळी आणि छठपूजेच्या गर्दीसाठी पार्सल विभागाशेजारी स्वतंत्र मंडप; प्लॅटफॉर्मवरचा ताण कमी
गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पुणे रेल्वे प्रशासनाने स्थानक परिसरात स्वतंत्र मंडप उभारला असून नोडल अधिकारी आणि आरपीएफचे अतिरिक्त जवानही नेमले आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत आहे. ती लक्षात घेऊन पुणे रेल्वे प्रशासनाने काही खास उपाययोजना केल्या आहेत. प्लॅटफॉर्मवरचा ताण कमी व्हावा म्हणून स्थानक परिसरात पार्सल विभागाशेजारी स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि सोय डोळ्यांसमोर ठेवून पुणे रेल्वे विभागाने हे विशेष नियोजन केले आहे.
सणासुदीच्या काळात पुणे रेल्वे स्थानकावरून उत्तर भारतासह वेगवेगळ्या भागांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी मोठी गर्दी होण्याची शक्यता असते. अशा गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय तर होतेच, शिवाय चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना घडण्याचा धोकाही असतो. हा धोका टाळण्यासाठी यंदा रेल्वे प्रशासनाने मुख्य प्लॅटफॉर्मवरचा ताण कमी करणारा स्वतंत्र मंडप उभा केला आहे.
या मंडपात प्रवाशांना बसण्यासाठी आणि गाडीची वाट पाहण्यासाठी लागणाऱ्या सुविधा देण्यात आल्या आहेत. पुरेसा प्रकाश मिळावा म्हणून दिवे, पंखे, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय आणि प्रसाधनगृहे उपलब्ध आहेत. दिवाळी विशेष गाड्या कधी येणार आणि कधी सुटणार, हे प्रवाशांना सहज कळावे म्हणून माहिती देणारे फलकही लावले आहेत. प्रवाशांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी रेल्वेचे अतिरिक्त कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
प्रवाशांची सुरक्षा आणि व्यवस्थापन पाहण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) अतिरिक्त जवानही तैनात केले आहेत. गर्दीचे नियोजन, प्रवाशांना मार्गदर्शन आणि स्थानक परिसरातील सुरक्षितता यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या वेळेआधी विनाकारण प्लॅटफॉर्मवर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानक परिसरात उभारलेल्या स्वतंत्र मंडपाचा वापर करावा आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.
कायमस्वरूपी व्यवस्थेबाबतही माहिती देण्यात आली आहे. पुणे स्टेशनबाहेर MSRTC बस स्थानकाच्या शेजारी कायमस्वरूपी Passenger Holding Area (प्रवासी थांबा क्षेत्र) प्रस्तावित आहे. त्याचे क्षेत्र 5800 चौ. मी. असून ते नंतर 7000 चौ. मी. पर्यंत वाढवण्यात येणार आहे. सध्या पार्सल ऑफिसजवळ तात्पुरती व्यवस्था होती, पण ती अपुरी पडत होती, म्हणून नव्या जागेचा विचार प्रस्तावित आहे. या कायमस्वरूपी कामाला डिसेंबर 2026 पर्यंत सुरुवात होणार आहे.
दिवाळीसाठी सध्या प्लॅटफॉर्म 1 जवळ VIP साईडिंगला 21500 sq ft (2000 चौ. मी.) चा तात्पुरता होल्डिंग एरिया तयार करण्यात आला आहे. तिथे एकाच वेळी 3500 प्रवासी बसू शकतात.