मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:00 IST

येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठाचा मृत्यू; कंत्राटदाराची सर्व कामे काढून घेणार

येरवड्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या सुमारे १५ फूट खोल खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर पुणे महापालिकेने संबंधित कंत्राटदारावर कारवाई सुरू केली आहे.

येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठाचा मृत्यू; कंत्राटदाराची सर्व कामे काढून घेणार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पुणे : येरवडा परिसरात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या सुमारे १५ फूट खोल खड्ड्यात पडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पुणे महापालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराविरोधात कारवाई सुरू केली आहे. कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याला काळ्या यादीत टाकण्यासह त्याच्याकडे सुरू असलेली सर्व कामे काढून घेतली जाणार आहेत. गुन्हा दाखल व्हावा म्हणून पोलिसांकडे तक्रारही देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

घटनास्थळी खड्ड्याभोवती लावलेले बॅरिकेडिंग मजबूत नव्हते, असे आयुक्तांनी सांगितले. तिथे फायबरचे बॅरिकेडिंग होते, त्यामुळे अपघाताच्या वेळी ते पुरेशी सुरक्षा देऊ शकले नाही. कंत्राटदाराचे काम ठरवलेल्या उद्दिष्टानुसार वेगाने सुरू होते, पण सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये झालेली चूक गंभीर आहे, असे ते म्हणाले. मजबूत बॅरिकेडिंग केले असते, तर ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचू शकला असता, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

साधारणपणे कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई एखाद्या विशिष्ट प्रकल्पापुरती मर्यादित असते. या प्रकरणात मात्र त्याच्याकडे सुरू असलेली सर्व कामे काढून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कारवाईआधी कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस देऊन त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर नियमानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याबाबतही चौकशी : या कंत्राटदाराकडे शहरात किती कामे सुरू आहेत, याची माहिती गोळा केली जात आहे. शहरात ड्रेनेज आणि इतर पायाभूत सुविधांची कामे अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्या कामांवरील संबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातील. चौकशीत जे दोष समोर येतील, त्यांच्या आधारे नवी प्रमाणित कार्यपद्धती तयार केली जाईल, असे राम यांनी सांगितले.

अपघातानंतर ज्येष्ठ नागरिकाला राजीव गांधी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना कोणत्या परिस्थितीत रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आणि त्याच रात्री त्यांचा मृत्यू कसा झाला, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे, असे आयुक्तांनी म्हटले. या प्रकरणाची माहिती घेण्यास पोलिसांना सांगितले आहे. अपघातात वाहनचालकाची किंवा मृत व्यक्तीची काही चूक होती का, याचा तपास पोलिस करतील. मात्र ड्रेनेजच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये झालेल्या त्रुटींकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

महापौरांच्या प्रतिक्रियेवरून वाद : येरवड्यात महापालिकेच्या मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याने शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेबाबत प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकाराला उत्तर देण्याऐवजी, "मी काय कॉन्ट्रॅक्टर आहे का? मी त्या माणसाला ढकललंय का? मी गाडी चालवत होते का?" असे प्रतिप्रश्न पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी केले. त्यामुळे त्यांनी जबाबदारीबाबत हात झटकल्याची टीका होत आहे. या संभाषणाची ध्वनिफीत समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर महापौरांच्या प्रतिक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ