दीक्षाभूमीवर अनुयायांचा महासागर; पुस्तक खरेदीसाठी प्रचंड गर्दी
७० व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर देश-विदेशातील बौद्ध अनुयायांची मोठी गर्दी झाली आहे. ४० हून अधिक देशांतील अनुयायी आले आहेत, तर पुस्तकांच्या दुकानांतही खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर ७० व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त देश-विदेशातील बौद्ध अनुयायांचा जनसागर लोटला आहे. निळे आणि पंचशील ध्वज, बाबासाहेबांचे छायाचित्र आणि त्यांच्या विचारांचा जागर यामुळे संपूर्ण परिसर भीममय झाला आहे. यंदा दीक्षाभूमीवर केलेले नियोजन आणि व्यवस्था विशेष लक्ष वेधून घेत आहेत. दुसरीकडे, पुस्तकांच्या दुकानांतही खरेदीसाठी अनुयायांची मोठी गर्दी उसळली आहे. या सगळ्यामुळे धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त नागपूर नगरी फुलून गेली आहे.
हिंदू धर्माच्या अत्याचारामुळे आणि त्या वेळच्या सामाजिक, राजकीय वातावरणात दलित लोकांना स्थान नसल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याच विचारांती आणि बऱ्याच कारणांनी निर्णय घेतला. दसऱ्याच्या दिवशी आपल्या लाखो अनुयायांना घेऊन त्यांनी नागपूरमधील दीक्षाभूमीवर दीक्षा घेतली आणि हिंदू धर्माचा त्याग केला. तेव्हापासून दर वर्षी दसऱ्याला आंबेडकरी समाज दीक्षाभूमीवर एकत्र येऊन हा दिवस साजरा करतो.
धम्मचक्रप्रवर्तन दिनासाठी देशातील विविध राज्यांसह विदेशातूनही मोठ्या संख्येने बौद्ध बांधव नागपुरात आले आहेत. ४० हून अधिक देशांतील भंतेगण, विचारवंत, संशोधक, अभ्यासक आणि माध्यम प्रतिनिधींनी दीक्षाभूमीवर हजेरी लावली आहे. रेल्वेस्थानक आणि बसस्थानकापासून दीक्षाभूमीकडे येणाऱ्या रस्त्यांवर अनुयायांची मोठी गर्दी दिसत आहे.
दीक्षाभूमी परिसरातील पुस्तकांच्या दुकानांत यंदा विशेष गर्दी आहे. वर्षभरात प्रकाशित झालेल्या विविध वैचारिक साहित्याला अनुयायांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित 'बुद्ध अँड हिज धम्म' आणि भारतीय संविधानाच्या प्रती घेण्यासाठी वाचकांची झुंबड उडाली आहे. हा दिवस फक्त धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता, या पुस्तक खरेदीतून ज्ञान, शिक्षण आणि वैचारिक परिवर्तनाचा संदेश अधोरेखित होत आहे.
यंदाच्या व्यवस्थेची वैशिष्ट्ये अशी आहेत. प्रशासनाने ८.९२ कोटी रुपयांच्या विशेष निधीतून नियोजन आणि व्यवस्थापन केले आहे. अनुयायांच्या विश्रांतीसाठी परिसरात ७ आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी मिळून एकूण २४ डोम उभारले आहेत. लहान मुले हरवू नयेत म्हणून सुरक्षा कवच म्हणून त्यांच्या हाताला मोबाईल क्रमांक असलेला बेल्ट बांधला जात आहे.
स्वच्छ पाण्यासाठी आरओची व्यवस्था केली आहे. पोलीस, मनपा, आरोग्य सुविधा आणि सामाजिक संस्था यांच्या समन्वयाने नियोजन झाले आहे. वाहतुकीच्या योग्य नियोजनासाठी प्रत्येक चौकात सज्जता ठेवली आहे. अनेक ठिकाणी भोजनदान आणि अल्पोपहाराची व्यवस्था आहे, तसेच अनुयायांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य शिबीर घेतले जात आहे.