दिल्लीत संसदेजवळ नॉर्थ ब्लॉकमागे आग, धुराचे काळे लोळ; जीवितहानी नाही
संसदेच्या अगदी जवळ असलेल्या नॉर्थ ब्लॉकच्या मागच्या बाजूला सोमवारी सकाळी धुराचे लोळ दिसले. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी गेल्या आहेत, कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी सकाळी संसदेच्या अगदी जवळ एकच खळबळ उडाली. अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या नॉर्थ ब्लॉकच्या (North Block) मागच्या बाजूला अचानक धुराचे काळे लोळ दिसू लागले. संसदेच्या परिसराजवळ हा प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळाकडे रवाना करण्यात आल्या आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा संसदेच्या दिशेने जात असताना त्यांना नॉर्थ ब्लॉकमागून धुराचे मोठे लोट येताना दिसले. त्यांनी लगेच सोशल मीडियावर ट्विट करून चिंता व्यक्त केली. संसदेकडे जाताना नॉर्थ ब्लॉकच्या मागून दाट धूर निघताना दिसला, आग लागली असावी असे वाटते, असे त्यांनी लिहिले. परिसरातील सगळे जण सुरक्षित असावेत आणि आपत्कालीन यंत्रणा वेगाने प्रतिसाद देईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. देवरा यांच्या ट्विटनंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची तातडीने धावपळ सुरू झाली.
माहिती मिळताच दिल्ली अग्निशामक दलाने तातडीने कारवाई केली आणि पाण्याचे बंब घटनास्थळी पाठवले. आगीचे नेमके स्वरूप काय आहे, तसेच कोणत्या इमारतीला किंवा संरचनेला तिचा फटका बसला आहे, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या दुर्घटनेत कोणाचा जीव गेल्याचे किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही, ही दिलासादायक बाब आहे.
नॉर्थ ब्लॉक ही नवी दिल्लीतील अतिशय महत्त्वाची आणि सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील सरकारी इमारत आहे. या इमारतीत देशाचे गृह मंत्रालय (Home Ministry) आणि वित्त मंत्रालय (Finance Ministry) यांसारखी अत्यंत महत्त्वाची सरकारी कार्यालये कार्यरत आहेत. हा परिसर सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा भाग असून संसद भवनाच्या अगदी जवळ आहे. अशा उच्च सुरक्षेच्या भागात अचानक धुराचे लोळ दिसल्यामुळे सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत.
सध्या अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी आहेत. आगीचे कारण काय आहे आणि नुकसान किती झाले आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.