सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:22 IST

दीक्षाभूमी विकासाचा ९९१ कोटींचा आराखडा सरकारच्या मंजुरीसाठी प्रलंबित, गतीची मागणी

नागपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासासाठी चार टप्प्यांतील ९९१ कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य सरकारने लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात करण्यात आली.

दीक्षाभूमी विकासाचा ९९१ कोटींचा आराखडा सरकारच्या मंजुरीसाठी प्रलंबित, गतीची मागणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीचा कायापालट करण्यासाठी ९९१ कोटी रुपयांचा विकास आराखडा प्रस्तावित आहे. हा प्रकल्प चार टप्प्यांत राबवला जाणार असून, राज्य सरकारने त्याला तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात दीक्षाभूमीच्या विकासाबरोबरच बौद्ध धम्माचा जागतिक संदेश आणि बुद्धांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता यावरही भर देण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने मंगळवारी दीक्षाभूमी येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजित केला होता. त्या वेळी अधिवक्ता शैलेश नारनवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल असलेल्या जनहित याचिकेची माहिती दिली. विकासकामांसाठी ९९१ कोटी रुपयांचा आराखडा तयार असून, त्याची अंमलबजावणी चार टप्प्यांत करण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला लवकर मंजुरी द्यावी, अशी अपेक्षाही नारनवरे यांनी व्यक्त केली.

जगाला बुद्धांच्या विचारांची गरज : समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. म्यानमारचे भदंत वन्ना सिरी महाथेरो प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. फ्रान्समधील प्राकुंट बुद्धिस्ट अकादमीचे अध्यक्ष डॉ. टी. धम्म रतन यांनी जागतिक परिस्थितीवर बोलताना बुद्धांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. आर्थिक संकटे आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांनी ग्रासलेल्या जगाला शांतता, सहअस्तित्व आणि मानवी न्यायाचा मार्ग दाखवण्यासाठी तथागत गौतम बुद्धांची शिकवण उपयुक्त ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. बौद्ध धम्माचा प्रभाव आता आशिया खंडाच्या पलीकडेही वाढत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, दिल्लीचे भंते करुणाकरण यांनी महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी केली. बौद्ध समाजासाठी स्वतंत्र वैयक्तिक कायदा असण्याची गरज असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

विचार फक्त आठवणीत नव्हे, तर आचरणातही हवेत : कर्नाटकचे जेसे ठाकपा जिंगपा यांनी सांगितले की, बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रमाणे प्रत्यक्ष जीवनात वागणे, हेच त्यांना खरे अभिवादन आहे. बौद्ध धम्म हा संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्ग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात देश-विदेशातून आलेल्या बौद्ध भिक्खूंनी आणि अनुयायांनी बुद्ध व डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. बेंगळुरूचे जिग्मे सुल्ट्रीम महाथेरो, सारनाथचे डी. रेवतथेरो, अधिवक्ता आनंद फुलझेले आणि स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ