धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमी परिसरात तीन दिवसांत 144 टन कचरा उचलला
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून परिसर स्वच्छ ठेवला. या विभागाने तीन दिवसांत दीक्षाभूमी परिसरातून एकूण १४४ टन कचरा उचलला. अंबाझरी, बेझनबाग आणि उंटखाना परिसराच्या स्वच्छतेतही या कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली. लाखो अनुयायी शहरात आल्यानंतरही मनपा प्रशासनाने शहराची स्वच्छता राखली आहे.
या कामासाठी तीन पाळ्यांमध्ये 872 सफाई कर्मचारी, 234 कचरा संकलक, 3 सक्शन मशीन, 3 चोकेज मशीन आणि 190 कचरा कुंड्या वापरल्या गेल्या. कचरा वाहून नेण्यासाठी 108 गाड्या होत्या. भांडेवाडीत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 4 कॉम्प्रॅक्टर वापरण्यात आले.
नागपूर महानगरपालिकेने नागरी सुविधा, स्वच्छता आणि वाहतुकीची जबाबदारी पार पाडली. गेल्या 18 ऑक्टोबरपासून मनपाचे कर्मचारी 24 तास कामावर होते आणि त्यांच्या कामाचे तीन पाळ्यांमध्ये वाटप केले होते. प्रत्येक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नोझल अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. लाखो अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून महापौर निता ठाकरे आणि आयुक्त डॉ. विपीन यांच्या निर्देशानुसार नियोजन झाले. महापौरांसह उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर आणि परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे यांनी नियमित पाहणी केली.
अतिरिक्त आयुक्त श्री. अंकीत, श्री. मुरुगानंथम एम. आणि श्री. मिलिंद मेश्राम यांनी हे नियोजन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. आयुक्त डॉ. विपीन यांनी स्वतः व्यवस्थेकडे लक्ष दिले. 20 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनीही त्यांनी नागरी सुविधांची पाहणी केली, अनुयायांना अडचणी येत नाहीत ना याची खात्री करून घेतली आणि अनुयायांशी बोलून सुविधांबद्दल त्यांचे मत जाणून घेतले.
कचऱ्याची उचल आणि विल्हेवाट हे मुख्य काम घनकचरा व्यवस्थापन विभागाचे होते. शहरात कचरा संकलन करणाऱ्या अॅन्टोनी वेस्ट हॅंडलिंग कंपनी आणि मे. बीव्हीजी इंडिया लिमीटेड यांच्या मदतीने हे काम झाले. दोन्ही कंपन्यांनी तीन पाळ्यांमध्ये 108 वाहने तैनात केली होती आणि त्यांचे 234 कर्मचारी कचरा संकलित करत होते. उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त श्री. धनंजय जाधव आणि स्वच्छता अधिकारी श्री. ऋषीकेश इंगळे यांच्या नेतृत्वात मोहीम राबवली गेली. एनडीएसच्या कर्मचाऱ्यांनीही योगदान दिले; एनडीएसचे प्रमुख श्री. वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात त्यांचे पथक दीक्षाभूमी परिसरात तैनात होते.
अनुयायांच्या निवाऱ्यासाठी परिसरात 21 डोम उभारले होते, तसेच 1200 वर शौचालये होती. ही सर्व शौचालये गडर लाईन्सना जोडली होती. रस्त्यावर किंवा परिसरात साचणारा कचरा लगेच उचलण्यासाठी सफाई कर्मचारी तैनात होते आणि ही सेवा मनपाने 24 बाय 7 ठेवली होती. पोलीस विभागाला सुरक्षा व्यवस्थेसाठी मदत म्हणून मनपाने ४४ स्थायी आणि १६ अस्थायी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून दिले. रस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी १२० नळ बसवले होते, प्रत्येक निवारा केंद्रावरही पाण्याची सोय होती आणि अतिरिक्त प्रकाश व्यवस्था केली होती.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचरा कुंड्या ठेवल्या होत्या, त्यामुळे रस्त्यांवर कचरा कमी साचला. जमा झालेला कचरा भांडेवाडीत नेण्यासाठी दोन पाळ्यांमध्ये काम झाले आणि 108 वाहनांनी तो तात्काळ नेला. त्यामुळे दीक्षाभूमी परिसरात कचरा साचून राहिला नाही.
दीक्षाभूमीवरून ड्रॅगन पॅलेस आणि चिचोलीतील शांतीवनात जाण्यासाठी मनपाच्या परिवहन विभागाने आपली बसची विशेष व्यवस्था केली होती. परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश लुंगे यांनी सांगितले की 18 ते 20 ऑक्टोबर या काळात 58 हजार 84 प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. ही सेवा 18 ऑक्टोबरपासून सुरू झाली आणि त्यासाठी 267 बस तैनात होत्या. 18 ऑक्टोबरला 12 बसमधून 1204 प्रवाशांनी दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस प्रवास केला. 19 ऑक्टोबरला 49 बस होत्या आणि 9625 अनुयायांनी प्रवास केला; चिचोलीसाठी 6 बसमधून 534 प्रवाशांनी प्रवास केला.
20 ऑक्टोबरला सर्वाधिक 41 हजार 175 अनुयायांनी दीक्षाभूमीवरून ड्रॅगन पॅलेसला जाण्यासाठी आपली बस वापरली. त्यासाठी मनपाने 145 बस दिल्या होत्या. त्या दिवशी नारा, चिचोली, नारी, गांधीपुतळा, बेलतरोडी, यशोधरानगर आणि गिड्डोबानगरसाठीही प्रवाशांनी आपली बसने प्रवास केला.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.