दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांची वाहन खरेदीला पसंती, ८ हजार ९९१ वाहनांची नोंदणी
मुंबईतील चारही आरटीओ कार्यालयांत दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीची नोंद झाली. विक्रीत दुचाकींचा वाटा सुमारे सत्तर टक्के आहे.
हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्त मानले जातात आणि दसरा हा त्यापैकी एक मानला जातो. याच दसऱ्याच्या मुहूर्तावर यंदा मुंबईकरांनी नवे वाहन घरी आणण्याला पसंती दिली. तब्बल ८ हजार ९९१ वाहनांची खरेदीसाठी नोंदणी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील चारही आरटीओ कार्यालयांत ही नोंद करण्यात आली.
या नोंदणीत सर्वाधिक ६ हजार २०६ दुचाकी आहेत, तर १ हजार ७८५ चारचाकींची खरेदी नोंदवली गेली आहे. दसऱ्याच्या सणाला मुंबईकरांचा कल इलेक्ट्रिक वाहने आणि दुचाकींकडे जास्त दिसला.
प्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ताडदेव म्हणजेच मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली या चारही आरटीओ कार्यालयांत मिळून एकूण ८७९८ वाहनांची नोंद झाली. या चारही आरटीओंपैकी मुंबई सेंट्रल हद्दीत सर्वाधिक ३५३७ वाहनांची नोंदणी झाली. त्यानंतर वडाळा आणि अंधेरी यांचा क्रमांक लागला. मुंबई सेंट्रल विभाग आघाडीवर राहिला आणि तिथे दुचाकींबरोबरच चारचाकी वाहनांच्या खरेदीतही वाढ झाली.
आरटीओनुसार चारचाकींचा आकडा पाहिला, तर मुंबई सेंट्रलमध्ये सर्वाधिक ९२४ चारचाकींची नोंद झाली. त्यापाठोपाठ अंधेरीत ५८८, वडाळ्यात ५५५ आणि बोरिवलीत १७२ चारचाकी वाहनांची नोंद झाली. शहरी भागात चारचाकींची मागणी सतत वाढत असल्याचे यावरून दिसते.
दुचाकींची आकडेवारी १३ ते २० ऑक्टोबर या काळातील आहे. या काळात मुंबई सेंट्रल आरटीओत २,४०१ दुचाकींची भर पडली. वडाळा आरटीओत २,१४६, अंधेरी आरटीओत १,३५१ आणि बोरिवली आरटीओत ३१२ दुचाकींची नोंद झाली. त्यामुळे एकूण ८,७९८ वाहनांपैकी ६,२१० वाहने केवळ दुचाकी आहेत, आणि हा आकडा एकूण विक्रीच्या सुमारे सत्तर टक्के आहे.
यंदा पेट्रोलवर चालणारी दुचाकी घेताना ग्राहकांमध्ये ई-२० पेट्रोलबद्दल मोठी भीती आणि संभ्रम होता. ई-२० पेट्रोलमुळे इंजिनची क्षमता आणि मायलेज यांच्यावर परिणाम होईल, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र आता सर्व वाहन कंपन्या वाहनांच्या इंजिनवर ई-२० असे स्पष्ट लिहून देतात आणि प्रमाणपत्रही देतात. त्यामुळे अनेकांनी निर्धास्त मनाने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नवी दुचाकी घरी आणली.
सणासुदीच्या काळात वाहन कंपन्यांकडून आकर्षक सवलती आणि भेटवस्तू दिल्या जातात. बँकांकडून सोपे आणि कमी व्याजदराचे कर्ज मिळते. शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी करण्याची मुंबईकरांची पारंपरिक मानसिकताही आहे. या सगळ्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या आठवड्यात वाहन बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळाली.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.