चंद्रपूर जिल्ह्यात चारा लागवडीला सुरुवात, पशुधन जगवण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भद्रावती तालुक्यातील आष्टी (काकडे) येथील तलावात मका चाऱ्याची लागवड करून जिल्हास्तरीय उपक्रमाचा शुभारंभ झाला.
चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय चारा लागवड उपक्रमाला शुक्रवारी सुरुवात झाली. भद्रावती तालुक्यातील आष्टी (काकडे) गावातील तलावात मका चाऱ्याची लागवड करून पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री असलेले उईके चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, असे उईके यांनी सांगितले. अशा वेळी पशुधन जिवंत ठेवणे गरजेचे आहे. आतापासूनच चारा आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले, तर लोकसहभागातून या परिस्थितीवर आपण निश्चित मात करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाला वरोराचे आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आणि भद्रावतीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ उपस्थित होते.
जिल्ह्यातील पाच माजी मालगुजारी (मामा) तलावांत आणि लघु पाटबंधारे (लपा) तलावांत महिला बचत गटांच्या माध्यमातून चारा लागवड केली जात आहे, असे उईके यांनी सांगितले. यातून बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येत आहे. चारा लागवडीतून लोकचळवळ उभी राहावी, यासाठी जिल्ह्यात इतर ठिकाणीही असा उपक्रम राबवला जाणार आहे. हा उपक्रम आपल्या पशुधनासाठी आहे, असे गावातील प्रत्येकाला वाटले पाहिजे, असेही ते म्हणाले.
लोकसहभागातूनच चळवळ उभी राहते, असे सांगून उईके म्हणाले की, आज तुमच्या गावात चारा लागवडीचे उद्घाटन करण्यासाठी मंत्री, आमदार, कलेक्टर आणि सीईओ हे सगळे आले आहेत. चारा लागवड हा नुसता एक शब्द नाही, त्याचे महत्त्व फार मोठे आहे आणि लोकांनी त्याचे गांभीर्य लक्षात घ्यावे. चारा लागवड आणि पाणी व्यवस्थापनात आष्टी (काकडे) गावाचे अनुकरण इतर गावांनी करावे. महिलांनी पुढाकार घेतला तर परिवर्तन नक्कीच होते. आपला जिल्हा महाराष्ट्रात चारा लागवड आणि पाणी व्यवस्थापनात आघाडीवर असावा, असे आवाहन पालकमंत्री उईके यांनी केले.
आमदार करण देवतळे यांनी सांगितले की, त्यांच्या विधानसभा क्षेत्रात पाणी आणि चारा टंचाईचे नियोजन करण्यात आले आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. दुष्काळी परिस्थितीत चारा आणि पाणी टंचाईवर आपण नक्की मात करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शुभारंभाआधी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुहास रोडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. सतीश अगडते आणि डॉ. प्रमोद जल्लेवार यांनी माहिती दिली. निकृष्ट चारा सकस करणे, मुरघास आणि अझोला यांची प्रात्यक्षिके त्यांनी दाखवली. चारा साक्षरता अभियान आणि संवर्धन योजनेची माहितीही दिली. या वेळी नागरिकांना मोफत वैरण बियाणे आणि ठोंबे वाटण्यात आले. त्यानंतर मका वैरण बियाण्याची पेरणी करून पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय शुभारंभ झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी केले. विस्तार अधिकारी प्रणाली भागवत यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सतीश अगडते यांनी आभार मानले. तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गट, प्रभाग संघातील महिला आणि इतर नागरिक या वेळी उपस्थित होते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.