शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:55 IST

चिमुकल्यांच्या हृदयशस्त्रक्रियांसाठी आमदार जोरगेवार यांचा पुढाकार, बालके चंद्रपूरहून मुंबईकडे रवाना

चंद्रपूर येथील मोफत हृदयरोग तपासणी शिबिरात हृदयाशी संबंधित आजार आढळलेली बालके पालकांसह उपचारांसाठी मुंबईकडे निघाली.

चिमुकल्यांच्या हृदयशस्त्रक्रियांसाठी आमदार जोरगेवार यांचा पुढाकार, बालके चंद्रपूरहून मुंबईकडे रवाना छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर येथे आयोजित मोफत हृदयरोग तपासणी शिबिरात हृदयाशी संबंधित आजार आढळलेल्या चिमुकल्यांना पुढील उपचारांसाठी आज मुंबईकडे रवाना करण्यात आले. चंद्रपूर रेल्वे स्टेशनवरून ही बालके आपल्या पालकांसह मुंबईच्या दिशेने निघाली. तिथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या मोफत हृदयशस्त्रक्रिया उपक्रमाचा हा भाग आहे.

लहान मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य हेच त्यांच्या कुटुंबाचे खरे सुख असते. मात्र जन्मजात हृदयरोगामुळे अनेक चिमुकल्यांच्या आयुष्यावर संकट येते आणि त्यांच्या पालकांनाही आर्थिक अडचणींबरोबरच मोठ्या मानसिक संघर्षाला तोंड द्यावे लागते. अशा कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण व्हावा, यासाठी हा उपक्रम सुरू असून अनेकांसाठी तो आधार ठरत आहे.

काही दिवसांपूर्वी चंद्रपूर येथे लहान बालकांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आले होते. आमदार जोरगेवार यांच्या पुढाकारातून जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि मुंबई येथील किम्स रुग्णालय यांच्या सहकार्याने हे शिबिर झाले. शिबिरातील तपासणीत हृदयरोग किंवा हृदयाशी संबंधित आजार आढळलेल्या बालकांवर मुंबई येथे मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या पाल्याच्या उपचारांची चिंता करणाऱ्या पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

या उपक्रमांतर्गत यापूर्वीही २६८ बालकांच्या हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. अनेक बालकांना नव्या आयुष्याची संधी मिळाली असून त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहण्याची वेळ कोणत्याही बालकावर येऊ नये, या भावनेतून हा उपक्रम राबविला जात असून तो आरोग्यसेवेतील सामाजिक बांधिलकीचे महत्त्व दर्शविणारा ठरत आहे.

आज चंद्रपूर रेल्वे स्टेशनवरून बालकांनी पालकांसह मुंबईकडे प्रवास सुरू केला, तेव्हा सुमित बेले, अरुण तिखे यांच्यासह भारतीय जनता पक्ष महानगरातील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बालकांना उपचारांसाठी रवाना करताना त्यांच्या चेहऱ्यावर निरोगी आयुष्याची आशा दिसत होती. आपल्या लेकरांनी पुन्हा आनंदाने बागडावे, खेळावे आणि निरोगी आयुष्य जगावे, ही स्वप्ने पालकांच्या डोळ्यांत तरळत होती. या प्रवासात केवळ उपचारांची अपेक्षा नसून, मुलांच्या आयुष्यातील संकट दूर होऊन नव्या भविष्याची सुरुवात होईल, हा विश्वासही पालकांच्या मनात आहे.

चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य पुन्हा खुलावे, त्यांच्या आयुष्यातील वेदना दूर व्हाव्यात आणि त्यांचे बालपण आनंदाने बहरावे, हीच भावना या उपक्रमामागे असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ