शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:09 IST

वय झालं म्हणून दुर्लक्ष नको; धाप, थकवा हे हृदयाच्या झडपांच्या आजाराचे संकेत असू शकतात

मुंबईतील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आशिष अग्रवाल यांनी सहा लक्षणांकडे लक्ष देण्याचा इशारा दिला आहे.

वय झालं म्हणून दुर्लक्ष नको; धाप, थकवा हे हृदयाच्या झडपांच्या आजाराचे संकेत असू शकतात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

संध्याकाळी रोज फिरायला जाणारे बाबा अचानक घरातच बसू लागतात, जिना चढताना आईला धाप लागते, किंवा घरातले ज्येष्ठ "वय झालंय, दुसरं काय" म्हणत आपली कामं हळूहळू कमी करतात. अनेक घरांमध्ये हे चित्र सामान्य वाटतं. वय वाढलं की शरीराची ताकद कमी होणारच, असं मानलं जातं. पण प्रत्येक वेळी थकवा किंवा धाप लागणं हे फक्त वयामुळेच असेल असं नाही. त्यामागे हृदयाचा एखादा गंभीर आजार असू शकतो, असा इशारा मुंबईतील इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजिस्ट, म्हणजेच हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आशिष अग्रवाल यांनी दिला आहे.

डॉ. अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, रोजची कामं करताना सुरुवातीला जाणवणारी काही लक्षणं लोक ताणतणाव, धावपळीची दिनचर्या किंवा वाढतं वय अशी कारणं देऊन सोडून देतात. मात्र ही लक्षणं सतत दिसत असतील, तर ती चिंतेची बाब ठरू शकते.

अशी सहा लक्षणं त्यांनी सांगितली आहेत. पहिलं म्हणजे रोजची साधी कामं करतानाही धाप लागणं. दुसरं, नेहमीपेक्षा जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणं. तिसरं, चक्कर येणं किंवा डोकं हलकं वाटणं. चौथं, पायांवर किंवा घोट्याभोवती सूज येणं. पाचवं, चालण्याचा किंवा कामाचा वेग मंदावणं. सहावं, हृदयाचे ठोके जलद होणं, धडधडणं किंवा अनियमित वाटणं.

विशेषतः 55 वर्षांवरील व्यक्तींमध्ये ही लक्षणं हार्ट वॉल्व्ह डिसीज, म्हणजेच हृदयाच्या झडपांच्या आजाराशी संबंधित असू शकतात, असं डॉ. अग्रवाल यांनी सांगितलं. हृदयाची एखादी झडप नीट उघडत किंवा बंद होत नाही, तेव्हा रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. हा आजार खूप हळूहळू वाढतो आणि सुरुवातीची लक्षणं अगदी वाढत्या वयासारखीच वाटतात. त्यामुळे आजार गंभीर टप्प्यावर पोहोचेपर्यंत त्याची ओळखच होत नाही.

या सगळ्यात कुटुंबीयांची भूमिका महत्त्वाची आहे. त्रास होणारी व्यक्ती अनेकदा स्वतःहून डॉक्टरकडे जायला तयार नसते किंवा त्रास सांगतही नाही. अशा वेळी घरातली तरुण मंडळी आणि काळजी घेणारे नातेवाईक हे बदल सर्वात आधी ओळखू शकतात. बाबांनी सकाळी फिरायला जाणं बंद केलं आहे, आईला सामान उचलताना त्रास होतोय, किंवा घरातले ज्येष्ठ वारंवार थकत आहेत, हे आधी कुटुंबाच्याच लक्षात येतं. म्हणून हा फक्त वयाचा परिणाम आहे असं गृहीत धरून गप्प न बसता, नातेवाइकांनी त्यांच्याशी बोलून त्यांना वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी तयार करणं गरजेचं आहे, असं सांगण्यात आलं.

लक्षणं जुनी होत असतील किंवा वाढताना दिसत असतील, तर उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं डॉ. अग्रवाल यांनी म्हटलं आहे. 55 वर्षांवरील प्रौढांनी आपल्या नियमित तपासणीत इकोकार्डोग्राम, म्हणजेच ECHO ही चाचणी करून घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ही अतिशय सोपी आणि वेदनारहित अल्ट्रासाऊंड चाचणी आहे. तिच्यातून हृदयाचे ठोके, रक्ताभिसरण आणि वॉल्व्हची कार्यक्षमता नेमकी समजते, आणि लक्षणं गंभीर होण्याआधीच आजाराचं निदान करता येतं, असं त्यांनी सांगितलं.

वय वाढलं म्हणजे आनंदानं आणि उत्साहानं जगणं सोडायचं असा अर्थ होत नाही. जिना चढणं, फिरायला जाणं किंवा नातवंडांबरोबर खेळणं या गोष्टी वयोवृद्धपणीही शक्य आहेत. गरज आहे ती शरीरातल्या बदलांकडे गांभीर्यानं बघण्याची. घरातले ज्येष्ठ अचानक मंदावले असतील किंवा थकत असतील, तर ते फक्त वयामुळे आहे असं न मानता डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि वेळीच उपचार घ्यावेत, असं डॉ. अग्रवाल यांच्या सल्ल्यातून पुढे येतं.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ