'चिकीझिंग' चित्रपटाचं शीर्षकगीत प्रदर्शित, १९ नोव्हेंबरला येणार चित्रपटगृहांत
'झिंग चिकी चिकी झिंग' हे 'चिकीझिंग' या आगामी मराठी चित्रपटाचं शीर्षकगीत व्हिडीओ पॅलेसच्या सहकार्याने प्रेक्षकांसमोर आलं आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
'चिकीझिंग' या आगामी मराठी चित्रपटाचं शीर्षकगीत नुकतंच प्रेक्षकांसमोर आलं आहे. 'झिंग चिकी चिकी झिंग' असे या गाण्याचे बोल आहेत. व्हिडीओ पॅलेसच्या सहकार्याने हे गाणं प्रदर्शित झालं आहे. बालपणीच्या निरागस आठवणी, मातीचा सुगंध, भावंडांमधलं निखळ प्रेम आणि ग्रामीण जीवनातला गोडवा असा अनुभव हे गाणं देतं. खेळकर शब्द, ठेका धरायला लावणारं संगीत आणि ग्रामीण जीवनाचं लोभस चित्रण यांमुळे गाण्याकडे लक्ष वेधलं जात आहे. हा चित्रपट १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
या शीर्षकगीताला गौरी जोशी आणि पद्मनाभ गायकवाड यांचा आवाज लाभला आहे. वैभव कुलकर्णी यांनी गाण्याचे खट्याळ शब्द लिहिले असून श्रीनिधी व्यंकट यांनी त्यांना सुरेल चाल लावली आहे. कृष्णराज वाईंगडे आणि सहकलाकारांवर हे गाणं चित्रित झालं आहे. स्नेहा पाटील आणि सेजल कोरे यांनी त्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे.
मुलांचं कल्पनाविश्व, त्यांच्या निरागस खोड्या आणि छोट्या गोष्टींतून आनंद शोधण्याची वृत्ती या गाण्यात दिसते. लाल मातीचे रस्ते, हिरवीगार शेतं, कौलारू घरांच्या ओवऱ्या, शाळेतली धमाल आणि वाहत्या पाण्याचे प्रवाह यांमुळे गावाकडचं देखणं चित्र समोर उभं राहतं. बालकलाकारांच्या निरागस हालचाली आणि बहीण-भावाच्या नात्यातली माया गाण्याला भावनिक स्पर्श देतात. त्यामुळे हे गाणं नुसतं ऐकण्यासारखं नाही, तर बालपणीच्या आठवणींत रमवणारा दृक्-अनुभवही ठरतं.
'चिकीझिंग' हा चित्रपट ग्रामीण भागातलं बालपण, शाळेतली गंमतजंमत, भावंडांमधला जिव्हाळा आणि कौटुंबिक नात्यांचं भावविश्व मांडणार आहे. बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपटातून अशा प्रकारचं बालगीत समोर आल्याने रसिकांचं लक्ष या गाण्याकडे गेलं आहे.
दिपक वाणी आणि जयप्रकाश भांडे हा चित्रपट सादर करत आहेत. ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शनच्या सहकार्याने त्याची निर्मिती केली आहे. सुप्रिया बगाटे या निर्मात्या असून शब्बीर साबुवाला, रचना वोरा, हृषिकेश देशमुख, सिड विंचुरकर, करण चव्हाण आणि उमेश कुलकर्णी हे सहनिर्माते आहेत. राजेंद्र बगाटे आणि वैभव कुलकर्णी यांनी चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन केलं आहे.
चित्रपटात प्रभाकर मोरे, कृष्णराज वाईंगडे, सेजल कोरे, अमृता सुरेश, गायत्री देशपांडे, आदित्य घनश्याम, राहुल कुलकर्णी आणि डॉ. सोनाली घाटणेकर यांच्या भूमिका आहेत. प्रवीण सोनावणे यांनी छायांकन केलं आहे, तर शेखर गुरव आणि एस. शंकर यांच्याकडे संकलनाची जबाबदारी होती. श्रीनिधी व्यंकट आणि हृषिकेश कुलकर्णी यांनी संगीत दिलं असून सुरेश कुंभार यांनी कला दिग्दर्शन आणि वेशभूषा सांभाळली आहे.
बालपणीच्या आठवणी, ग्रामीण जीवनातला साधेपणा आणि नात्यांमधलं प्रेम यांचा अनुभव देणारा हा चित्रपट १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत येणार आहे. प्रेक्षकांना बालपणीच्या रम्य विश्वाची पुन्हा एकदा सफर घडणार का, याची उत्सुकता आहे.