बाळासाहेब ठाकरे कलादालन उघडण्यासाठी दरमहा १० लाखांचा खर्च उचलण्याची सरनाईक यांची तयारी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
लोकार्पणानंतरही बंद असलेल्या मिरा-भाईंदरमधील कलादालनावरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सत्ताधाऱ्यांना आणि महापालिका प्रशासनाला धारेवर धरले असून, दिवाळीत किमान सात दिवस शाळकरी मुलांसाठी ते खुले करण्याची सूचना केली आहे.
मिरा-भाईंदरमधील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे लोकार्पण होऊन गेले, तरी नागरिकांसाठी त्याचे दरवाजे अजूनही बंदच आहेत. या गोष्टीवरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सत्ताधाऱ्यांना आणि महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. दिवाळीच्या निमित्ताने हे कलादालन किमान सात दिवस शाळकरी मुलांसाठी खुले करावे आणि त्यानंतरही ते नियमितपणे सुरू ठेवावे, अशी स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
एवढेच नाही, तर कलादालनाच्या देखभालीसाठी दरमहा सुमारे १० लाख रुपये खर्च येणार असेल, तर तो खर्च उचलण्याची तयारीही सरनाईक यांनी दाखवली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कलादालनाचे लोकार्पण झाले होते. त्या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हेही उपस्थित होते. इथे विज्ञान केंद्र, बालविभाग, सभागृह, प्रदर्शन दालने, वाचनालय आणि उपाहारगृह अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तरीही लोकार्पण होऊन गेल्यावर कलादालन अजून नागरिकांसाठी खुले झालेले नाही, म्हणून लोकांमध्ये नाराजी आहे.
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार, कलादालनाची सुरक्षा, स्वच्छता, कर्मचारी, तिकीट व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा, जनरेटर, सीसीटीव्ही आणि लिफ्ट यांच्या देखभालीसाठी दरमहा सुमारे १० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. शिवाय इमारत अजून कंत्राटदाराकडून महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही आणि कलादालन कसे चालवायचे, याचे धोरणही ठरलेले नाही, असे सांगितले जात आहे.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती आणि खर्चाची जबाबदारी यामुळे कलादालन सुरू करायला उशीर होत असेल, तर महापौरांनी तसे लेखी पत्र द्यावे, असे सरनाईक यांनी सांगितले. महापालिकेला दरमहा दहा लाखांचा खर्च परवडत नसेल, तर हा संपूर्ण खर्च उचलण्याची माझी तयारी आहे, असे प्रताप सरनाईक यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. निवडणुकीच्या काळात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागायची आणि त्यांच्याच नावाने उभारलेल्या कलादालनाला विरोध करायचा, ही भूमिका योग्य नाही, अशी टीका त्यांनी केली. बाळासाहेबांच्या विचारांचा आणि नावाचा सन्मान राखायचा असेल, तर हे कलादालन तातडीने नागरिकांसाठी खुले झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका सरनाईक यांनी मांडली.
आता प्रताप सरनाईक यांनी स्वतः दरमहाचा खर्च उचलण्याची तयारी दाखवल्यानंतर तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे दरवाजे नागरिकांसाठी उघडणार का, याकडे मिरा-भाईंदरकरांचे लक्ष लागले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.